⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

बचतगटांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : झेडपी सीईओ अंकीत

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२३ । केंद्र सरकारतर्फे यंदाचे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. आपल्याकडे तृणधान्याचे उत्पादन चांगले असून त्यापासून अनेक पौष्टिक पदार्थ तयार केले जातात. बचतगटांनी अशा पौष्टिक पदार्थांच्या उत्पादनापासून त्याचे महत्त्व देखील पटवून द्यायला हवे. बचतगटांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या अडचणी दूर व्हावा आणि अधिकाधिक महिलांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिले.

नेहरू युवा केंद्र जळगाव आणि क.ब.चौ.उ.म.वि. जळगाव समाजकार्य विभाग आणि महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग जळगाव आगारतर्फे तृणधान्य खाद्य मेळावा आणि नशा मुक्ती अभियानाचे जळगाव बसस्थानकावर आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याला निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, विभागीय अधिकारी महेश सुधळकर, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, विद्यापीठ समाजकार्य विभागाचे डॉ.दीपक सोनवणे, जळगाव आगार व्यवस्थापक संदीप पाटील, आत्माचे सेवानिवृत्त अधिकारी अनिल भोकरे, कामगार अधिकारी कमलेश भावसार, लेखाधिकारी मिलिंद सांगळे, नरेंद्र चित्ते, सुरक्षा अधिकारी दीपक जाधव, विभागीय अभियंता निलेश पाटील, सांख्यिकी अधिकारी रविंद्र पवार आदी उपस्थित होते.

मेळाव्याच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन केल्यावर प्रास्ताविक करताना नेहरू युवा केंद्र जळगावचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आणि उद्देश मांडला. तदनंतर आत्माचे सेवानिवृत्त अधिकारी अनिल भोकरे यांनी तृणधान्य, डॉ.दीपक सोनवणे यांनी नशा मुक्ती विषयावर मार्गदर्शन केले. मेळाव्यात प्रसिद्ध रंगकर्मी विनोद ढगे यांनी जनजागर पोवाडा आणि पथनाट्य सादर केले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.

मेळाव्यात जिल्हाभरातील बचत गट आणि उत्पादकांनी लावलेल्या विविध स्टॉलला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्यासह सर्वांनी भेट दिली. काही पदार्थांचा देखील त्यांनी आस्वाद घेतला. मेळाव्यासाठी नेहरू युवा केंद्राचे लेखापाल अजिंक्य गवळी यांच्यासह युवा स्वयंसेवक तेजस पाटील, रोहन अवचारे, चेतन पाटील, योगेश चौधरी, हेतल पाटील, तुषार साळवे, रितेश भारंबे, अजिंक्य तोतला व जळगाव स्टार्ट अप ग्रुप यांचे सहकार्य लाभले. नवीन बस्थानकावर आयोजित मेळाव्यात दिवसभर अनेक प्रवाशांनी विविध स्टॉलला भेट देऊन वस्तूंची खरेदी केली.