जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना कमी होताना दिसत नसून याच दरम्यान जामनेर तालुक्यातील कोदोली रस्त्यावर मालवाहू रिक्षा व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. पृथ्वीराज जगन चव्हाण असं (रा. भागदरा ता. जामनेर) मृत तरुणाचं नाव आहे

दुचाकीस्वार पृथ्वीराज चव्हाण हा तरुण आपले काम आटोपून कोदोली रस्त्याने गावाकडे जात असताना जामनेरकडे येणाऱ्या मालवाहू रिक्षाची आणि त्यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या धडकेत त्याला जबर मार लागल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर ग्रामस्थांनी तसेच रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनी त्याला रुग्णालयात हलवले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेबाबत जामनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहे.

दरम्यान, मृत पृथ्वीराज चव्हाण याच्या पश्चात लहान मुलगा व पत्नी असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूमुळे परिवाराचा आधार गमावला असून, लहान मुलाचे पितृछत्र हरवले. या घटनेमुळे कोदोली परिसरात शोककळा पसरली आहे.








