जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील वाकडी येथून एक दुर्देवी घटना समोर आलीय. ज्यात २१ वर्षीय अमोल वाल्मिक पाटील याने शेतात जाऊन गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. धक्कादायक म्हणजे अमोलचे अवघ्या सात दिवसांवर लग्न होते. त्यापूर्वीच त्याने टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आई- वडिलांनी एकच आक्रोश केला.

अमोल हा वाकडी येथे आई- वडील आणि दोन भावांसह वास्तव्यास होता. वडिलांना शेतीकामात तो मदत करत करत कुटुंबाला हातभार लावत होता. अशातच अमोलने शेतात जाऊन गळफास घेतल्याची घटना घडली आहे. दरम्यान अमोल याचे खामखेडा (ता. मुक्ताईनगर) येथील मुलीशी लग्न ठरले. २० मेस हळद व २१ मेस लग्न असल्याने घरात तयारी सुरू होती. पत्रिकांचे देखील वाटप करण्यात आले होते. मुलाचे लग्न असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, १२ मे रोजी रात्री जेवण झाल्यानंतर अमोल हा शेतात गेला. यानंतर तो घरी परतलाच नाही. तर सकाळी अमोल याने शेताच्या बाजूला एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना दिसून आला.
घटनेची माहिती परिवाराला देण्यात आली. तसेच पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. अमोल याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र मुलाच्या मृत्युमुळे आई- वडिलांचा आक्रोश अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणणारा होता.