जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढताना दिसत असून अशातचशहरातील चंदू अण्णा नगरमधील ३५ वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुकेश पाटील (वय 35, चंदू अण्णा नगर) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुलाच्या आजारपणासाठी आणि कोरोना काळात व्यवसाय करण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या पैशांमुळे लवेश चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी मुकेश यांना धमकावले आणि शिवीगाळ केल्याचा आरोप मयत मुकेशच्या पत्नीने केला आहे. मुकेश यांची दुचाकी देखील लवेशने आपल्या साथीदारांसह बळजबरीने हिसकावून घेतली. त्यानंतर या जाचाला कंटाळून मुकेश पाटील यांनी राहत्या घरी जीवन संपवले.
याबाबत पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून मुकेशच्या नातेवाइकांनी लवेश चव्हाण आणि इतरांवर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली आहे. जोपर्यंत कडक कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्यामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.