जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२३ । जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून या घटनांमुळे वाहनधारक धास्तावले आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलीसांनी आज बुधवारी चोरीच्या दुचाकींसह एका तरुणाला अटक केली आहे संतोष शांताराम सपकाळे (रा. जोशीवाडा, मेहरूण) असे अटक केलेल्या तरुणाचं नवा असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील मेहरूण परिसरात असलेल्या विठ्ठल मंदिराजवळ कल्पेश लहू कोल्हे हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २० जुलै रोजी त्याच्या राहत्या घरासमोर त्यांनी त्याची दुचाकी (एमएच १५ डीजे ६१५६) ही दुचाकी घरासमोर पार्किंगला लावली होती. त्यावेळी मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेली होती.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही दुचाकी संशयित आरोपी संतोष शांताराम सपकाळे याने चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी त्याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने इतर चोरीच्या दोन दुचाकी चोरी केल्याचे कबुली दिली व दोन्ही दुचाकी काढून दिल्या. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.