जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । यावल तालुक्यातील बोरावल येथील तरुणाचा तापी नदीच्या पात्रात पाय घसरून पडल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडली. योगेश देवराम शांकोपाळ (वय-३६) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, योगेश शांकोपाळ हा शेळगाव बॅरेज येथे डंपरवर चालक म्हणून काम करतात. दररोज सकाळी ७ वाजेच्या दरम्यान त्याची दुचाकी तापी नदीच्या किनाऱ्यावर लावून तेथुन पोहत पोहत नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जावून कामाला जात असे. नेहमीप्रमाणे गुरूवारी २८ ऑक्टोबर रोजी योगेश दुचाकी भालशिव येथील तापी नदीच्या काठी दुचाकी लावून दुसऱ्या किनाऱ्याकडे जात असतांना अचानक बुडला. यासंदर्भात योगेशच्या पत्नीने योगेशी संपर्क केला परंतू संपर्क होवून शकला नाही.
त्यानंतर योगेशच्या नातेवाईकांनी भालशिव परिसरात शोध घेतला असता दुचाकी आढळून आली परंतू योगेश दिसून आला नाही. दरम्यान आज शुक्रवार २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास भालशिव गावाजवळ योगेशचा मृतदेह आढळला. नातेवाईकांनी मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणला. वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला यांनी शवविच्छेदन केले.
याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे.