जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२४ । मलकापूर येथून बसने भुसावळात येऊन रेल्वेने अहमदाबादला जाणाऱ्या प्रवाशाच्या बॅगेत चार किलो ओला गांजा आढळून आला. मुसाफिर खान्यातील लगेज स्कॅनरमध्ये त्याच्या बॅगची तपासणी केल्यावर हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी समीर खान जमील खान (रा.अहमदाबाद, गुजराथ) याला अटक केली असून त्याच्याकडून जप्त केलेल्या गांजाची किंमत ४० हजार रूपये आहे. दरम्यान, सातत्याने रेल्वे स्थानकावर गांजावर होत असलेली कारवाई पाहता मोठे नेटवर्क कार्यरत असल्याची शक्यता आहे.
भुसावळ रेल्वे जंक्शन स्थानकावर बसस्थानकाकडील बाजूच्या मुसाफिरखाना परिसरात लगेज स्कॅनर आहे. तेथील रेल्वे सुरक्षा बलाचे जवान रफिक शेख, भूषण पाटील, अतुल कराळे यांनी स्थानकावर जाणारा प्रवासी समीर खान जमील खान (रा. अहमदाबाद, गुजरात) याच्या बॅगेची स्कॅनरमध्ये तपासणी केली. त्यात संशयास्पद पाकिट आढळले.
जवानांनी ते पाकिट पंच व सहायक आयुक्त अशोककुमार, निरीक्षक पी.आर.मीणा यांच्यासमक्ष फोडले. त्या पाकिटात उग्र दर्प असलेला पदार्थ आढळला. तपासणीत हा ओला गांजा असल्याचे निष्पन्न झाले. आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांनी हा गांजा जप्त केला. त्याचे वजन चार किलो भरले. १० हजार रुपये किलोप्रमाणे किमत ४० रुपये आहे . संशयित समीर खान जमील खान यास अटक केल्यानंतर त्याच्याविरोधात लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयीताने हा गांजा मलकापूर येथून बसद्वारे आणल्याची माहिती असून हा गांजा अहमदाबाद येथे विक्रीसाठी नेला जात असल्याचे समजते. यंत्रणेकडून याबाबत सखोल चौकशी केली जात आहे. अधिक तपास लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, संशयितास न्यायालयात हजर केले असता त्याला ११ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.