जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२१ । देवदर्शनासाठी गेलेल्या बोदवडमधील तरुण मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथील नर्मदा नदीपात्रात आंघोळीसाठी गेला असता पाय घसरून नदीत बेपत्ता झाल्याची घटना घडली. गोपाळ माळी (वय ३५) असे या तरुणाचे नाव आहे. डोळ्यादेखत तो नदीपात्रात बेपत्ता झाल्याने कुटुंबीय हादरले आहेत.

याबाबत असे की, बोदवड येथील रेणुका नगरमधील रहिवासी व ओम्नी व्हॅन चालक गोपाळ माळी हा आपली आई, मावशी, पत्नी व दोन लहान मुलांसह स्वतःच्या मालकीच्या गाडीने गुरुवारी ओंकारेश्वर येथे दर्शनासाठी गेला होता. रात्री दहा वाजता ते ओंकारेश्वर येथे पोहोचले. शुक्रवारी पहाटे पाच वाजता तो नर्मदा नदीपात्रात आंघोळीसाठी गेला असता पाय घसरून नदीत बेपत्ता झाला. बारा तास पाणबुडे व पट्टीच्या पोहणाऱ्यांनी त्याचा शोध घेतला. मात्र अद्याप त्याचा शाेध लागू शकलेला नाही.
डोळ्यादेखत तो नदीपात्रात बेपत्ता झाल्याने कुटुंबीय हादरले आहेत. बोदवड येथील गोपाळ माळी याचे मित्र ईश्वर वाशिमकर व मंगेश शिरसोले यांनी शुक्रवारी संध्याकाळी त्याच्या कुटुंबियांना ओंकारेश्वर येथून घरी बोदवड येथे पाठवले. त्यानंतर जामनेर येथे त्याच्या सासऱ्याच्या घरी कुटुंबीयांना पोहोचवले. गोपाळ माळी याच्या वडिलांचे निधन झाले असून तो एकुलता एक कमावता कर्ता पुरुष होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, दहा व पाच वर्ष वयाची दोन मुले असा परिवार आहे. अत्यंत शांत, मनमिळावू स्वभावाने तो सर्वांना परिचित असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.