जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२४ । राज्यातील जळगावसह काही जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. कमाल तापमान ४५ अंशांवर गेल्याने तीव्र उष्णता जाणवत आहे. उकाड्यातून कधी दिलासा मिळेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मात्र जळगावसह सहा जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज 27 मे रोजी धुळे, जळगाव, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर आणि अकोला या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
राज्यात नागरिक उष्णतेच्या झळांनी हैराण झाले असून काल राज्यात विविध भागात पावसाने हजेरी लावली. दरम्यान आज राज्यातील ६ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, धुळे,जळगाव, हिंगोली, नांदेड, अकोला, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यातील तापमान ४३ ते ४७ अंश सेल्सिअसवर पोचले असून तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ३ जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.