जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२३ । विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होऊन मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्याला उद्यापासून म्हणजेच १४ सप्टेंबरपासून तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला, तर बैलपोळ्याच्या सणानिमित्त शेतकऱ्यांना मिळालेला हा मोठा दिलासा मानला जाईल. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात आज आणि उद्या बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आहे. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.
येत्या ४८ तासांत या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज
पुढील ४८ तासांत विदर्भातील यवतमाळ, वाशिम, गोंदिया, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, भंडारा, अमरावती अकोला जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पासून पुढील १६ तारखेपर्यंत या जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. तर धुळे, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जळगावला तीन दिवस अलर्ट?
गेल्या काही दिवसापूर्वी महिन्याभराच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. यामुळे खरिपाच्या पिकांना नवीन संजीवनी मिळाली. जिल्ह्यात अद्यापही मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. अशातच आता उद्या १४ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर पर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.