जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ आता ग्रामीण भागातही पाहायला मिळत आहे. यातच यावल तालुक्यातील पूर्णवाद नगर येथे दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली असून यावेळी चोरट्यांनी पंकज अमृत बारी (वय ३९) यांच्या घरातून ३ लाख २ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेबाबत असे की, पूर्णवाद नगरमधील वास्तव्यास असलेले पंकज अमृत बारी हे ३ मार्च २०२५ रोजी सकाळी साकळी येथे मंदिरासाठी पुट्टी भरण्यासाठी गेले होते. त्यांचे वडील सकाळी ६ वाजल्यापासून चहाच्या दुकानावर होते. आई मनुदेवी मंदिरावर कीर्तन ऐकण्यासाठी गेली होती. घरी कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्याने घरफोडी केली.
दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास पंकज बारी यांची आई घरी परतली असता घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यावर कपाट उघडे आणि सामान विखुरलेले होते. पंकज बारी यांना तात्काळ घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी घरी येऊन पाहणी केली असता कपाटातील रोख रक्कम आणि दागिने चोरीला गेले होते. यात १ लाख १२ हजारांची रोकड, सोन्याचे मनी, अंगठ्या, चांदीचे हाताचे कडे, कमरपट्टा असा एकुण ३ लाख २ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे समोर आले आहे.
पंकज बारी यांनी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.