---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ गावी भरते नवरदेव-नवरीची यात्रा; खान्देशात आहे प्रसिद्ध

navara navari yatra
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । देव-देवतांच्या नावाने यात्रोत्सव भरत असतात हे तुम्ही ऐकलं असेल. पण नवरदेव-नवरीची यात्रा भरते हे ऐकलं नसेल. होय जळगाव जिल्ह्यात असे एक गाव आहे, जिथे देव-देवतांची नव्हे तर, नवरदेव-नवरीची यात्रा भरत असते. धरणगाव तालुक्यातील भोणे या गावी ही यात्रा भरते. यंदाही पौष अमावास्येनिमित्त भोणे या गावी जगावेगळी अशी ही यात्रा भरली आहे.

आडवळणाला असूनही आणि कोणतीच ऐतिहासिक पार्श्वभूमी नसताना, भोणे हे यात्रेचे गाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण खान्देशात प्रसिद्ध आहे. भोणे हे जेमतेम दोन हजार लोकवस्तीचे भुसावळ-सुरत रेल्वे लोहमार्गालगत वसलेले छोटेसे गाव. नंदुरबारमार्गे सुरत जाणाऱ्या दोन आणि येणाऱ्या दोन पॅसेंजर गाड्या या ठिकाणी थांबतात.

म्हणून नवरदेव-नवरीचे यात्रा भरते?
अलीकडे या देवस्थानाचे नामकरण लक्ष्मीनारायण असे झाले असले तरी यात्रा नवरदेव-नवरीची म्हणूनच ओळखली जाते. भोणे गावातील या यात्रोत्सवामागे एक आख्यायिका सांगितली जाते. एके दिवशी राजघराण्यातील वऱ्हाड नवरदेव-नवरीसह ग्वाल्हेर येथून कोल्हापूरकडे निघाले होते. संपूर्ण वऱ्हाड भोणे येथील तळ्याशेजारी असलेल्या एका खडकावर मुक्कामासाठी थांबले होते. रात्री आचाऱ्यांनी स्वयंपाकाला प्रारंभ केला. त्यावेळी खडक हलू लागला. तो खडक नव्हता तर भले मोठे कासव होते. विस्तवाच्या चटक्यामुळे त्याची हालचाल होऊन तलावात ते डुबकी घेऊ लागले होते.

कासव तलावात बुडताच बेसावध वऱ्हाडही बुडाले. त्यावेळी एका नाभिकाने नवरदेव-नवरीला खांद्यावर उचलून वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, नवरदेव-नवरी वाचू शकले नाहीत. वऱ्हाडातील जे लोक वाचले, त्यांनी तळ्याच्या काठावर नंतर नवरदेव आणि नवरीचे मंदिर बांधले. सदरची घटना पौष अमावास्येला घडली होती. त्यामुळे त्या दिवशी भोणे येथे भाविकांची नवरदेव-नवरीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होऊ लागली. पुढे त्यास यात्रेचे स्वरूप आले.

भोणे गावातील नवरदेव-नवरीच्या यात्रेत पूर्वापार मातीच्या माठापासून महिलांच्या दागिन्यांपर्यंत, पोळपाट लाटण्यापासून तांबे पितळीच्या भांड्यांपर्यंत सर्व काही विक्रीसाठी येत असते. मात्र, पूर्वीसारखे बैल गाड्यावरील तगतराव आता निघत नाहीत. कुस्त्यांच्या दंगलीही नसतात. यात्रेनिमित्त तमाशाचे फड मात्र रंगतात.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---