जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांना परिचित असलेला जागतिक वारसा म्हणजे ‘अजिंठा लेणी’ (Ajintha Caves). जळगाव शहरापासून अवघ्या ५५ किलोमीटर अंतरावर तर औरंगाबाद शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर डोंगरात लेण्या कोरलेल्या असून त्याठिकाणी वाघूर नदीचा उगम देखील आहे. अजिंठा लेणी समूहामध्ये एकूण २९ लेण्या असून त्या नदी पात्रापासून १५ ते ३० मीटर उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगांमध्ये कोरलेल्या आहेत. बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी आज आंतरराष्ट्रीय पर्यटनाची एक ठळक ओळख बनलेली आहे.
अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनोस्कोने १९८३ साली घोषित केली आहे आणि या लेण्यांना भारतातील पहिल्या जागतिक वारसास्थळाचा मान आहे. जून २०१३ मध्ये महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांची घोषणा करण्यात आली असता त्यात अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे. लेण्यांमधील चित्रांपैकी एका लेण्याचे चित्र भारतीय चलनातील २० रुपयांच्या एका नोटेवर आहे. उंच डोंगरावर आणि जंगलाने वेढलेल्या असल्यामुळे लेण्या बऱ्याच वर्ष अज्ञात होत्या. मध्ययुगातील अनेक चिनी बौद्धधर्मीय प्रवाशांनी अकबराच्या काळापर्यंत उपलब्ध असलेल्या आपल्या प्रवास वर्णनांत या लेण्यांचा उल्लेख केला आहे.
..म्हणून अजिंठा लेणी (Ajintha Caves) राहिली अपूर्ण
प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा होता. तसेच त्याचा उपयोग राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय होता. अजिंठा गावाजवळच्या लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी असे मानले जाते. पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडांत निर्माण केली गेली. लेणी क्रमांक ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इ.स. पूर्व दुसऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून बुद्धांचे दर्शन स्तूप-रूपांने होत असते. या व्यतिरिक्त १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धांचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजांच्या राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते. वाकाटक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर लेण्यांची निर्मिती अचानक थांबली व ही लेणी योजित भव्यतेपासून वंचितच राहिली.
वाघाची शिकार करताना लागला लेणीचा शोध, रॉबर्ट गिलचे जुळले एक नाते
अजिंठा लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास प्रांतातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने २८ एप्रिल सन १८१९ रोजी लागला. स्मिथने येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंधुकपणे दिसून येते. अजिंठा लेणीशी जुळलेले एक नाव म्हणजे चित्रकार, छायाचित्रकार रॉबर्ट गिल. दि.२६ सप्टेंबर १८०४ ते १० एप्रिल १८७५ हा काळ ब्रिटिश भारतातील एक सैन्याधिकारी, चित्रकार तसेच छायाचित्रकार रॉबर्ट गिल यांचा होता. अजिंठा येथील चित्रशिल्पांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांची प्रतिकृती तयार करण्यासाठी इंग्रजांनी सन १८४४ मध्ये त्यांच्या सैन्यातील चित्रकार रॉबर्ट गिल याची नेमणूक केली. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’त चित्रकला शिकलेला मेजर गिल हा अजिंठय़ाच्या पायथ्याशी असलेल्या लेणापूर गावी दाखल झाल्यानंतर त्याची भेट पारो या स्थानिक तरुणीशी झाली. लेण्यांचे आणि या चित्रांचे महत्त्व जाणणाऱ्या पारोने त्याला नैसर्गिक रंगसाहित्य पुरवण्यापासून सर्वतोपरी सहाय्य केले. या दोघांत एक प्रकारचे नाते निर्माण झाले. मात्र या नात्याला काही नाव नसल्याने ग्रामस्थांकडून त्यांना जोरदार विरोध झाला. काही वर्षांपूर्वी रॉबर्ट गील आणि पारोच्या जीवनावर आधारीत ‘अजिंठा’ हा चित्रपट देखील झळकला होता.
अशी आहे अजिंठा लेणीची रचना
अजिंठ्यातील चित्रे ही प्रामुख्याने बुद्धांच्या जीवनावर आधारित जातक कथांचे चित्रण करतात. बुद्धाच्या जन्मापूर्वीपासूनच्या कथा यामध्ये समाविष्ट आहेत या कथांमधून सांस्कृतिक दुवे तसेच नीतिमूल्ये दिसून येतात. बुद्धाचे आयुष्य, त्याचे विविध अवतार, त्याचे पुढील जन्म असे सर्व वर्णन या जातक कथांमध्ये दिसून येते. भिंतींवरील जातकांची चित्रे ही बोधप्रद आहेत. दहाव्या आणि अकराव्या लेण्यातील सातवाहन कालीन चित्रकला पाहून तत्कालीन चित्रकारांचे कौशल्य लक्षात येते. एका चित्रात अनेक लोकांचा समूह चित्रित करण्याची या चित्रकारांची हातोटी विलक्षण आहे. अजिंठा येथे एकूण २९ लेण्यांपैकी हीनयान कालखंडातील लेण्यांमधली ९ व्या व १०व्या क्रमांकाची लेणी ही चैत्यगृहे आहेत व १२, १३, आणि १५-अ क्रमांकाचे लेणे हे विहार आहे. महायान कालखंडातील लेण्यांपैकी १९, २६ व २९ क्रमांकाची लेणी चैत्यगृहे असून १, २, ३, ५, ६, ७, ८, ११, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २२, २३, २४, २५, २७ व २८ क्रमांकांची लेणी विहार आहेत.
- अजिंठा लेण्यांना भेट देण्याचे तास सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० दरम्यान असतात.
- अजिंठा लेणी उघडण्याचे दिवस- सोमवारी लेणी सामान्य लोकांसाठी बंद असतात.
अजिंठा लेणी प्रवास टिप्स
- गर्दी आणि टूर बसेसवर मात करण्यासाठी सकाळी १० च्या आधी लेण्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा.
- एलोरा येथील कैलास मंदिराच्या आसपासच्या डोंगरावर चढून तुम्हाला एक उत्कृष्ट दृश्य आणि दृष्टीकोन मिळू शकेल.
- लेण्यांमध्ये आपल्यासोबत टॉर्च आणा कारण त्यापैकी बऱ्याच गुहांमध्ये अंधार आहेत आणि प्रकाशयोजना कमी आहे.
अजिंठा लेण्यांपर्यंत कसे पोहोचावे – (How to reach Ajintha Caves)
अजिंठा लेणी पाहण्यासाठी तुम्हाला अगोदर औरंगाबादला येणे आवश्यक आहे. औरंगाबाद मुंबईपासून सुमारे ३३० किलोमीटर अंतरावर आहे. औरंगाबाद शहराच्या मध्यभागी अजिंठा लेणी औरंगाबाद – अजिंठा – जळगाव रस्त्यावर सुमारे १०० किलोमीटर अंतरावर आहेत. लोकल टॅक्सी भाड्याने घेणे हा अजिंठ्याचा एक दिवसाचा प्रवास करण्याचा सर्वात पसंतीचा मार्ग आहे.
अजिंठा लेणी जवळचे बस स्टँड (Ajintha Nearby Bus Stand)
तुम्ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एमएसआरटीसी MSRTC) बस घेऊ शकता जी औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकापासून सिद्धार्थ गार्डन आणि प्राणीसंग्रहालयाच्या उत्तरेस जाते आणि तुम्हाला अजिंठा लेण्यांच्या प्रवेशद्वारावर सोडते. येथून लेण्यांसाठी १२१ रुपयांचे भाडे आहे.गुहेचे प्रवेशद्वारावर कॅफे, लहान रेस्टॉरंट्स आणि स्मरणिका दुकाने सह रांगेत आहे.
अजिंठा लेणी जवळचे रेल्वे स्टेशन (Ajintha Nearby Railway Station)
जळगाव शहर, अजिंठा लेण्यांपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर आहे आणि येथे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. जळगाव जंक्शन मुंबई, आग्रा, भोपाळ, नवी दिल्ली, ग्वाल्हेर, झाशी, गोवा, वाराणसी, अलाहाबाद, बेंगळुरू, पुणे यासारख्या महत्त्वाच्या शहरांशी चांगले जोडलेले आहे.
अजिंठा लेणी जवळचे विमानतळ (Ajintha Nearby Airport)
औरंगाबाद विमानतळ हे शहराच्या केंद्रापासून सुमारे साडेपाच किलोमीटर अंतरावर आहे आणि अजिंठा लेण्यांसाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे.