⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | महिलादिन विशेष : डॉ. उषा नारायण जगताप

महिलादिन विशेष : डॉ. उषा नारायण जगताप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आई व्हावी मुलगी माझी, मी आईची आई …!!

जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । १९६३ साली लग्नानंतर जळगावात आली. माझे वडील सिव्हील हॉस्पिटलमध्ये आरएमओ होते. आई नगरपालिकेत मेडिकल आ़ॅफिसर म्हणून रूजू झाली. त्याकाळी जळगावातील स्कूटर चालवणारी ती पहिली महिला अशी तिची आठवण जळगावातील तिच्या काही महिला पेशंटनी मला आवर्जून सांगितली होती. नाशिकला सुप्रसिध्द वैद्य करमरकरांच्या हाताखाली आयुर्वेद आणि जळगावात नगरपालिकेत डॉ. अविनाश आचार्यांच्या मार्गदर्शनात पुढील दोन वर्षे डिलीव्हरी आणि गायनॅक संबधीत आ़ॅपरेशन करायला ती शिकली. १९६५ ला माझ्या जन्माच्या वेळी तिने नगरपालिकेची नोकरी सोडली. पुढे जळगावातच आर आर हायस्कूल जवळ , स्वतःचे “सुश्रुत हाॅस्पिटल” तिने सुरु केले. वरच्या मजल्यावर आम्ही राहात असू आणि खाली तिचे साधारणतः 10 बेडचे मॅटर्निटी हाॅस्पिटल होते.

तिचे हाॅस्पिटल म्हणते, कारण माझे वडील सिव्हील हॉस्पिटलचा जाॅब सोडून नगरपालिकेत चिफ मेडिकल आ़ॅफिसर म्हणून जाॅईन झाले होते. तिच्या पेशन्ट संबधी काही फार काॅम्प्लिकेशन असतील तर ते तिला मदतीला, आधाराला असतच किंवा सल्ला देत. पण हाॅस्पिटलची, पेशन्टची देखभाल मुख्यत्वे तिच करीत असे. कारण दादा ( माझे वडील डॉ एन टी जगताप) त्याच्या नगरपालिकेच्या टी बी सॅनेटरीयम मध्येच प्रचंड बीझी असत. ते १०० खाटांचे हाॅस्पिटल त्यावेळी संपुर्ण भरलेले असे आणि पेशंट वेटिंगलिस्ट वर असत.

आईच्या मेडिकल पेश्याच्या बरोबरीनेच अनेक आवडी निवडी तिने जपल्यात. त्यात अगदी शिवणकामापासून वाचनापर्यत. साधना,स्त्री, किर्लोस्कर,अशी अनेक मासिके ती नियमित वाचत असे. तिच्या काॅलेज जीवनात (नाशिक येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात) तिने नाटकांमधूनही कामे केली होती. पुढे ही नाटकांची आवड नाटक बघणे, इतकीच मर्यादित झाली. बालगंधर्व थिएटर आमच्या घराच्या अगदी जवळ. त्याकाळात जळगावात भरपूर नाटकेही येत. पण अनेकदा नाटकांचे तिकिट आठ-आठ दिवस आधी काढलेले असे. पण आम्ही नाटकाला जाऊ शकत नसू. कारण तिच्या हाॅस्पिटलमध्ये एखाददोन स्त्रिया डिलीव्हरीसाठी अडलेल्या असत. आणि अश्या वेळी पेशंटला नर्सच्या भरोश्यावर, दोन तीन तासांसाठी सोडणे, तिला कधीही पटत नसे. आणि तिच्याशिवाय जाणे आम्हाला पटत नसे, म्हणून आम्हीही घराच्या गच्चीवर बसून ते नाटक ऐकत असू.

तिला व्यायाम म्हणून पोहायला आवडायचे आणि ती, मला आणि माझ्या लहान बहिणीला पोहायला शिकवत असताना, स्विमींग टॅन्कवर, काही महिलांनी तिला ‘आम्हाला शिकवाल का विचारले’, ती सहजच ‘हो’ म्हणाली आणि पुढे संपूर्ण जैन महिला मंडळाच्या अनेक मैत्रिणींना तिने कोणताही मोबदला ना घेता स्विमींग शिकवले. ही आठवण मला आदरणीय रत्नाभाभींनीही एकदा सांगितली होती.

तिच्याकडे येणारे पेशंट हे सुद्धा सर्वधर्मिय, सर्वजातिय असत.ज्यात अनेक सिंधी, मुस्लिम स्त्रियाही असत. अनेक सिंधी शब्द तिला माहित झाले होते. शिवाय त्याकाळी संपूर्ण पोलीस लाईनमधील (काॅलनी, नवीन बस स्टॅन्ड समोर असलेली) महिला तिच्याकडे मोठ्या प्रमाणात पेशंट म्हणून येत असत. पोलिस काॅलनीसाठी तिची फी अतिशय थोडी आणि तीही बहुतांश उधारीचीच होती. महिन्याच्या शेवटाला ईश्वर नावाचा तिचा कंपाऊंड या उधारीची बिले घेऊन पोलीस लाईनमध्ये राऊंड मारून येतो, म्हणून जायचा. पण सगळेच पैसे दिले पाहिजे वगैरेचा आग्रह ना धरता, त्यातले जितके देतिल तितके घेऊन यायचा. तशीच तिची सूचना असायची. हे पोलीस बांधव आणि त्यांचे कुटुंबीय , तिची फि वर्षानुवर्ष , जणू विनव्याजी ई एम आर स्वरूपात द्यायचे. त्यामुळे जळगावातील सर्व पोलिस बांधव तिच्या ओळखीचे, त्यामुळे मी जोरात लुना चालवते, या खबरीने मी अनेकदा ओरडा खाल्ला आहे, हे आजही आठवते.

पुढे मी 17 वर्षाची असताना दादा (माझे वडील) गेलेत. माझी छोटी बहिण उर्मिला 12 वर्षाची आणि धाकटा भाऊ प्रसाद 10 वर्षाचा. पण आई त्या दुःखातुनही खंबीरपणे उभी राहिली. पुढच्या आयुष्यात आमची आई आणि वडील दोन्ही भूमिका तिनेच समर्थपणे निभावल्या. अगदी आमच्या तिघा भावंडांच्या आंतरजातीय विवाहाच्या वेळीही. आमच्या पाठीशी खंबीर उभी राहाणारी, तीच आमची शक्ती होती. पुढच्या आयुष्यात निवॄत्तीनंतर नातवंडांसाठी तर ती फार गोड मैत्रिण आहे.

मात्र, दादांच्या जाण्यानंतर, स्वतःच्या हाॅस्पिटलमधला तिचा आत्मविश्वास, कुठे तरी मोठ्या पोकळीत रुपांतरीत झाला असावा, कारण दादांच्या जागी मिळालेली नगरपालिकेतली नोकरी तिने परत स्विकारली आणि स्वतः च्या हाॅस्पिटलमध्ये फक्त आयुर्वेदिक प्राॅक्टीस सुरु ठेवली. नंतरही जळगावात सर्वप्रथम पंचकर्म चिकित्सा केंद्र तिने सुरु केले. आयुर्वेद प्रचारक मंडळ स्थापन करुन अनेक आयुर्वेदिक चिकित्सा मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक शिबिरे जळगावात घेतलीत. अनेक आयुर्वेदिक काॅलेजचे विद्यार्थी तिच्याकडे, शिकण्यासाठी येत असत. त्यावेळी त्यांच्या आयुर्वेदिक प्रचारक मंडळाला , शिवाजी उद्यानातील मोठी जागा आयुर्वेदिक औषधी आणि वनस्पती लावण्यासाठी मिळाली होती. तिथेही स्वतः जाऊन अनेक आयुर्वेदिक वनस्पती नवीन युवा आयुर्वेदिक डाॅक्टरांच्या मदतीने लावल्या होत्या. वाढत्या वयाबरोबर तिचे वाचन आणि लिखाणाचे विषय नक्की झालेत. अनेक आयुर्वेदिक दुर्मिळ ग्रंथ संपदा आज तिच्या संग्रही आहे. वैद्यकीय विषयावर तिने अनेक आयुर्वेदिक मासिकांमधून विपूल लिखाणही केले आहे. ज्याचे संकलन सध्या माझी लहान बहिण उर्मिला पशीने करते आहे.

आईला तिच्या कामासाठी अनेक पुरस्कार देखील मिळालेत. त्यातले महत्त्वाचे म्हणजे पुणे येथील वैद्य खडीवाले संशोधन संस्थेचा वैद्य लक्ष्मीबाई वेलणकर पुरस्कार आणि नागपूर येथील वैद्यनाथ पुरस्कार. आई जळगावात चिन्मय मिशनच्या स्थापने पासून सक्रिय सदस्य आहे. त्याचबरोबरीने चिन्मय मिशनसाठी ही अनेक समाज उपयोगी उपक्रम तिने घेतले आहेत. तिथे (नवीन बस स्टॅन्ड जवळ) मोफत दवाखना ती चालवत असे आणि लहान मुलांसाठी संस्कार वर्ग देखिल ती घेत होती. चिन्मय मिशनच्या कोल्हापूर, उत्तर काशी येथील अनेक शिबीरात तिने सहभाग नोंदवला आहे.

सध्या ती वय वर्षे ८० असून , दोन्ही गुडघ्याच्या आ़ॅपरेशननंतर, ते पूर्ण बरे न झाल्याने ती फारशी हिंडूफिरू शकत नाही. चालताना बरीच धाप लागते. रात्री घरीच पहाटेपर्यंत आ़ॅक्सीजन सिलेंडर लावावा लागतो. तरीही तिचे वाचन, लिखाण धिम्या गतीने सुरु असते. तेव्हा असे वाटते की, आई व्हावी मुलगी माझी, मी आईची आई…….

(डॉ. शमा सुबोध, जळगाव)

सौजन्य : Dilip Tiwari’s Diamond’s Group

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.