जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील तीन नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात एका महिलेने हातचलाखीने सोन्याचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार २७ ऑक्टोबर रोजी उघडकीस आला होता. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करून सीसीटीव्हीच्या चित्रणात कैद झालेल्या अज्ञात महिलेचा शोध घेतला जात होता. अखेर सोने लंपास करणाऱ्या महिलेला शनिपेठ पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बरेली येथून अटक केली आहे.

लकी शर्मा (वय ३८) असे या महिलेचे नाव असून, तिने २७ ऑक्टोबर रोजी जळगावातील पु. ना. गाडगीळ, आर. सी. बाफना ज्वेलर्स व भंगाळे गोल्ड या तीन दागिन्यांच्या शोरूममधून सुमारे ३ लाख ३० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या तीन अंगठ्या लंपास केल्या होत्या. गेल्या दहा वर्षांपासून चोरी करणारी ही महिला अत्यंत चलाख आहे. शोरूममध्ये डल्ला मारण्यासाठी तिने पद्धतशीरपणे योजना आखली होती. तिने यूट्यूब, सावधान इंडिया, क्राइम स्टोरी या टीव्ही सीरियल्स व क्राइम पुस्तके वाचून चोरीची कल्पना घेतली. बरेलीतून जळगावात आल्यावर तिने भंगाळे गोल्ड शोरूमजवळील फटाक्यांच्या दुकानांजवळील कचऱ्यात फेकलेले रिकामे टॅग शोधले आणि तेच चोरीसाठी वापरल्याचे चौकशीत समोर आले आहे. शोरूममध्ये जाऊन ती सोन्याच्या अंगठीचे मूळ टॅग काढून तिथे बनावट टॅग लावून मूळ टॅग चोरीसाठी वापरत होती.

जळगाव शहरात सराफ दुकानात चोरी करण्यापूर्वी लकी शर्मा या महिलेने कोणते शोरूम प्रसिद्ध आहेत, त्यांचे ठिकाण आणि रेल्वे स्टेशनचे लोकेशन याची संपूर्ण माहिती गुगल सर्च करून काढली होती. नंतर ऑक्टोबर महिन्यात लकी शर्मा हिने एकाच दिवशी दीड तासाच्या आत पु. ना. गाडगीळ, आर. सी. बाफना ज्वेलर्स व भंगाळे गोल्ड शोरुम्स अशा तीन शोरुम्समधील तीन अंगठ्यांवर डल्ला मारला होता. या दोन्ही ठिकाणांहून तिने सुमारे ३ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोने लंपास केले होते.








