जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२५ । जळगावच्या जामनेर तालुक्यात छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गावर भरधाव कार दुभाजकाला धडकून कारला आग लागल्याने यात कारमधील २१ वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू झाला. तर पती जखमी झाला. जान्हवी संग्राम मोरे (२१) असे मृत महिलेचे नाव आहे. ती तीन महिन्यांची गर्भवती होती.

भुसावळ तालुक्यातील माहेरी भेटीसाठी आलेल्या जान्हवी मोरे आणि त्यांचे पती पती संग्राम जालमसिंग मोरे (२६, दोन्ही रा. कुलमखेडा, जि. बुलढाणा) हे दोघे सोमवारी मोटारीने छत्रपती संभाजीनगरकडे निघाले होते. पहूर ते वाकोद दरम्यान दुपारच्या वेळी अचानक समोरच्या मालमोटारीने ब्रेक दाबल्याने मोरे दाम्पत्याची मोटार अनियंत्रित झाली. आणि थेट दुभाजकाला जाऊन धडकली. त्यानंतर लगेच इंजिनमधून धूर निघाला आणि मोटारीने पेट घेतला.

या अपघाताची माहिती मिळताच काही स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोटारीच्या काच फोडून आत बसलेल्या जान्हवी मोरे आणि संग्राम मोरे यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी संग्राम मोरे यांना मोटारीतून बाहेर काढण्यात यश आले. परंतु, मोटारीच्या मागील आसनावर बसलेल्या जान्हवी मोरे यांना बाहेर काढता आले नाही. आगीचे प्रमाण अचानक वाढल्याने त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. या घटनेत महिलेसह कार जळून खाक झाली आहे. दरम्यान जान्हवी मोरे तीन महिन्यांची गर्भवती होती

अपघातात गंभीर जखमी झालेले त्यांचे पती संग्राम मोरे यांच्यावर पहूर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले गेले. पहूर पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे. पोलीस उपअधीक्षक बापू रोहम यांनी पहूर ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन मृत व जखमींच्या नातेवाईकांची चौकशी केली. अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांना दिले.





