जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२५ । पाचोऱ्यातून मनाला चटका लावणारी एक घटना समोर आलीय. एका खासगी रुग्णालयात एक महिला प्रसूती झाली. लग्नानंतर १७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिलेने एक मुलगा व एक मुलगी अशा दोन गोंडस बाळांना जन्म दिला. जुळ्या मुलांचा जन्म झाल्याने कुटुंबात आनंदाला पारावार उरला नाही. परंतु नियतीच्या मनात काही वेगळचं होतं… काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं…बाळांना जन्म दिल्यानंतर अवघ्या तीन तासांतच आईने जगाचा निरोप घेतला. ही दुर्दैवी घटना पाचोरा शहरात घडली.

ज्योती ज्ञानेश्वर चौधरी (वय ३८) असे या दुर्दैवी आईचे नाव. उत्राण येथील सासर असलेल्या ज्योती चौधरी या परिवारासह पाचोरा येथे वास्तव्यास होत्या. पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागातील माहेर असलेल्या ज्योती यांना लग्नाच्या १७ वर्षांनंतर मातृत्वाची चाहूल लागली आणि पती, आई, वडील, भाऊ यांच्यासह नातेवाइकांना आनंद झाला. बुधवारी (दि १९) वेदना होऊ लागल्याने ज्योती यांना पाचोरा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
दरम्यान सायंकाळी ४ वाजता ज्योती चौधरी यांनी एक मुलगा व एक मुलगी अशा दोन गोंडस बाळांना जन्म दिला. लग्नानंतर तब्बल १६ वर्षांनंतर गरोदर राहिलेल्या ज्योती चौधरी यांना प्रसूती झाल्यानंतर ज्योतीसह तिच्या परिवाराचे आनंदाने मन भरून आले होते. मात्र नियतीला काही वेगळे अपेक्षित होते.
प्रसूतीनंतर अवघे तीन तास उटल्यानंतर ज्योती यांना छातीत त्रास होऊ लागला. दवाखान्यात एकच धावपळ उडाली आणि सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. या दुर्दैवी घटनेने महिलेचा पती, आई, वडील, भाऊ यांनी प्रचंड आक्रोश केला. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवारी पाचोरा येथे अतिशय शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.