जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२१ । उद्या म्हणजेच १ ऑगस्टपासून एटीएम वापरकर्त्यांच्या खिशाला आता अधिक झळ बसणार आहे. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI)एटीएम व्यवहारांवरील इंटरचेंज फीज वाढवली असल्याने उद्यापासून एटीएममधून रोकड काढणं महाग होणार आहे. याआधी १५ रुपये असलेली इंटरचेंज फीज आता १७ रुपये करण्यात आली आहे. तर नॉन बिगर वित्तीय व्यवहारांसाठी आकारण्यात येणारी फी ५ रुपयांवरून ६ रुपये करण्यात आली आहे. त्यानुसार उद्या १ ऑगस्टपासून नवे नियम लागू होणार आहेत.

‘आरबीआय’च्या नव्या नियमांनुसार, ग्राहक त्यांच्या बँकेच्या एटीएममधून दरमहा पाचवेळा व्यवहार करू शकतात. त्यासाठी त्यांना कोणतेही जादा शुल्क आकारले जाणार नाही, ज्यात आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहारांचा समावेश आहे. तसेच ग्राहक इतर बँकेच्या एटीएममधूनही विनामूल्य व्यवहार करू शकतात. महानगरांमध्ये ग्राहकांना तीन वेळा तर इतर ठिकाणी पाच वेळा व्यवहार करता येऊ शकतो.
इंटरचेंज शुल्क क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्यांकडून आकारले जाणार शुल्क आहे. जर कोणत्याही एका बँकेचा ग्राहक दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून आपले कार्ड वापरून पैसे काढत असेल, तर ज्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले जात आहेत, ती बँक व्यापारी बँक बनते.
निशुल्क व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर पुढील एटीएम व्यवहारांवर १ जानेवारी २०२२ पासून २१ रुपये द्यावे लागतील. सध्या यासाठी २० रुपये द्यावे लागतात. बँक आणि एटीएमचा खर्च वाढल्यानं तो भरून काढण्यासाठी ग्राहकांकडून आकारण्यात येणारं शुल्क वाढवलं जाईल अशी माहिती आरबीआयनं दिली आहे.