⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावच्या तरुणाईची पाऊले पुणे, मुंबई, नाशिकला का वळताय!

जळगावच्या तरुणाईची पाऊले पुणे, मुंबई, नाशिकला का वळताय!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा भौगोलिकदृष्ट्या पाहायला गेले तर राज्यात वरच्या बाजूला असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात दळणवळणाच्या सुविधांचा विचार केला असता सुरुवातीला मुंबई, नागपूर, सुरत, बऱ्हाणपूर, मध्यप्रदेशला जोडणारे मुख्य महामार्ग जळगावातून जात होते. रेल्वेच्या देखील दोन्ही लाईन म्हणजेच मुंबई आणि सुरत जळगावातूनच आहेत. दळणवळणच्या दमदार सुविधा, वजनदार पुढारी असताना देखील जिल्ह्याचा औद्योगिक विकास हवा तसा होऊ शकला नाही. जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांची भरभराट झाली अन् विद्यार्थ्यांचे नशीब उजळले. शिकून जिल्ह्यात नोकरीची वाट न पाहता तरुणाईने पुणे, मुंबईची वाट धरली. गेल्या काही वर्षात हजारोंच्या संख्येने जळगावकरांनी जिल्हा सोडला असून हि एक खेदजनक बाब आहे.

जळगाव जिल्हा तसा सर्वांनाच परिचित. एक तर केळी आणि कापूस आणि दुसरे म्हणजे सोने. अलीकडच्या काळात घोटाळे, स्कँडलमुळे नाव बदनाम झाले ते वेगळे. जळगाव जिल्ह्यात आजवर अनेक दिग्गज नेते होऊन गेले. मधुकरराव चौधरी, एकनाथराव खडसे यांचे नाव तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत देखील पोहचले. भाजपच्या खासदारांनी तर आजवर डंका वाजविला आहे. जळगाव जिल्ह्याचा आजही हवा तसा विकास झालेला नाही. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधताना पहिला मुद्दा येतो तो शिक्षणाचा आणि दुसरा म्हणजे उद्योगांचा.

जळगाव जिल्ह्यात मधल्या काळात शैक्षणिक संस्थांची मोठी भरभराट झाली. तालुका-तालुक्यात अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन महाविद्यालये उघडली. पदवीसह उच्चशिक्षणाची सोय जळगावात झाली. शासकीय महाविद्यालयात देखील सोयीसुविधा उपलब्ध होऊ लागल्या. वैद्यकीय महाविद्यालयामुळे जवळच सोय झाली. केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर राज्यातील विद्यार्थी देखील जळगावात शिक्षणासाठी येऊन गेले. विद्यार्थ्यांनी शिक्षण तर घेतले परंतु नोकरीची वानवा होऊन बसली. जळगाव बिझनेस हब किंवा आयटी सेक्टर सारखे विकसित झाले नसल्याने उच्चशिक्षीत तरुणांना वावच मिळत आहे.

जळगाव शहरात आणि जिल्ह्यात उद्योग येण्यासाठी जिल्ह्यात पूरक असे वातावरण आणि सोय देखील होती. जळगाव शहराला चौफेर जोडणारे मार्ग आहेत. मुख्यत्वे मुंबई, नागपूर, औरंगाबाद, मध्यप्रदेशकडे जाणारे महामार्ग आहेत. जळगावहून मुंबई, सुरत, पुणे, अकोलासह इतर जिल्ह्यांना आणि राज्यांना जोडणारे रेल्वेचे जाळे. दिल्ली ते चेन्नई, कोलकाता ते गोवा सर्वच ठिकाणी पोहचणे जळगावहून सहज शक्य होते. मालाची आवक-जावक करणे या दळणवळण सोयीचा लाभ घेतल्यास उद्योगांच्या दृष्टीने फायदेशीर होते.

जळगावात सर्वकाही पूरक असताना देखील उद्योग न येण्यामागे प्रमुख कारण म्हणजे राजकीय उदासीनता. जिल्ह्यातील आजवरच्या खासदार, आमदार, मंत्री महोदयांनी योग्य प्रयत्न केले नाही किंवा त्यांचा पाठपुरावा कुठेतरी कमी पडल्याने उद्योग जळगावात येऊ शकले नाही. जळगाव जिल्ह्यात आजही अनेक मोठे उद्योग असून त्यामाध्यमातून हजारो नागरिकांना रोजगार मिळाला आहे. रोजगार मिळाला हे खरे असले तरी त्यात जैन इरिगेशन, जैन पाईप, रेमंड, सुप्रीम पाईप, बॉश, लीग्रँड, पारले, मेरिको, स्पेक्ट्रम, दाल परिवार, हिरा उद्योग अशा मोजक्याच कंपनीत मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध आहे.

गेल्या दहा वर्षाचा कार्यकाळ लक्षात घेता राजकीय इच्छाशक्तीचा प्रचंड अभाव जाणवतो. जळगाव शहर सोडले तर तालुक्याच्या ठिकाणी स्थानिक आमदार आणि खासदारांच्या माध्यमातून रोजगार उपलब्धतेसाठी प्रयत्न केले जात आहे. प्रत्येक पंचवार्षिकला राज्याच्या मंत्रिमंडळात जळगाव जिल्ह्यातून किमान २ आमदारांचा समावेश होतो. राज्यात मोठा बोलबाला असलेले हे मंत्री देखील आजवर जिल्ह्यात रोजगार निर्माण करण्यात अपयशी ठरले. इतकंच काय तर एमआयडीसीचे क्षेत्रफळ देखील हवे तसे विस्तारले नाही.

जळगाव जिल्ह्यातील हजारो तरुण आज पुणे, मुंबई, नाशिक येथे स्थलांतरित झाले आहेत. केवळ नोकरीसाठी तात्पुरते स्थलांतरीत नव्हे तर घर घेऊन परिवारासह देखील तिकडे स्थायिक झाले आहे. जळगावच्या स्थानिक राजकारण्यांनी या संपूर्ण परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात उद्योग आले तर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास लवकर होणे शक्य आहे. तरुणांना रोजगार जिल्ह्यातच उपलब्ध झाल्याने मतदार देखील टिकून राहील हे निश्चित.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.