जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२४ । महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार अखेर रविवारी नागपुरात पार पडला. यांनतर आता खातेवाटपाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला तीन मंत्रिपदे कायम राहिली.
नवीन सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे गिरीश महाजन व संजय सावकारे यांनी शपथ घेतलीय. यात भाजपचा एक मंत्री वाढला आहे, यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिल पाटील यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला. तर संजय सावकारे यांना संधी मिळाली. दरम्यान आता जिल्ह्यातील तिन्ही नेत्यांना कोणती खाते मिळणार? आणि जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते? याची उत्सुकता जळगावकरांमध्ये आहेत.
यापूर्वीच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास, पर्यटन, पाणीपुरवठा, तसेच मदत व पुनर्वसन ही खाती जिल्ह्यातील मंत्र्यांकडे होती. आता हीच खाती राहणार की बदलणार, याकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील मंत्र्यांमध्ये गिरीश महाजन ज्येष्ठ असून, त्यांनी यापूर्वी पालकमंत्रिपद भूषविले आहे, तर संजय सावकारे राष्ट्रवादीत असताना त्यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली होती. काही काळासाठी त्यांनाही पालकमंत्रिपद मिळाले होते. शिंदेसेनेचे गुलाबराव पाटील यांची मंत्रिपदाची तिसरी टर्म असून, गेल्यावेळी तेच पालकमंत्री होते.
त्यामुळे यावेळीही पालकमंत्रिपद गुलाबराव पाटील यांनाच मिळावं अशी प्रबळ भावना शिंदेंच्या शिवसेनेने व्यक्ती केली आहे. जिल्ह्यातील अकराच्या अकरा जागा महायुतीने जिंकल्या आहेत. त्यात भाजप व शिंदेसेनेने प्रत्येकी पाच, तर अजित पवार गटाने एक जागा जिंकली आहे. आता जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाबाबत महायुतीचे नेते एकत्रित काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.