⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

Video Bomb : जाणून घ्या.. जळगावचा ‘तो’ तेजस मोरे कोण?

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२२ । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात व्हिडीओ बॉम्ब टाकत खळबळ उडवून दिली आहे. नुकतेच याप्रकरणी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी खुलासा करीत जळगावच्या तेजस मोरे नामक व्यक्तीने दिलेल्या घड्याळात कॅमेरा बसविण्यात आला होता आणि त्याद्वारे स्टिंग ऑपरेशन करण्यात आल्याचा आरोप केला होता. तेजस मोरेच्या नावाने जळगाव पुन्हा एकदा चर्चेत आले असून ‘तो’ तेजस मोरे कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तेजस मोरे हा गेल्या काही वर्षांपासून जळगावात राहतच नसल्याची माहिती समोर येत आहे.

जळगावमधील सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयास स्टिंग ऑपरेशन केल्याचा तेजस मोरेवर आरोप आहे. तेजस मोरे स्वतः बांधकाम व्यावसायिक आहेत. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्याचे जळगामधील घरी असलेले येणे-जाणे बंद असल्याचे समजते. जळगावातील झेडपी कॉलनीत त्यांचे घर आहे. तेजसवर जळगावातील एका पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याचे समजते. तेजसच्या वडिलांनी जळगावच्या जिल्हा परिषदेमध्ये अभियंता म्हणून काम केले आहे. त्यानंतर ते येथेच सेवानिवृत्त झाले होते अशी माहिती मिळाली आहे. एका वृत्तवाहिनीने देखील याबाबत वृत्त दिले आहे.

तेजसने सुरुवातीला जळगावमध्ये बांधकाम व्यवसाय सुरू केला. मात्र, तो इथे रमला नाही. दोन वर्षांनी तो पुण्यात गेला. सध्या तिथे तो बिल्डर म्हणून आपला जम बसवत असल्याची माहिती त्याच्या शेजाऱ्यांनी दिली आहे.. खूप कमी काळात तो मोठा झाला. त्याच्याकडे मध्यंतरी पोलीस यायचे. मात्र, तेजसच्या घरी राहुल जैन नावाचा मुलगा होता. तो त्यांना तेजस इथे रहात नाही असे सांगायचा. पोलीस यायचे आणि निघून जायचे. तेजस मोरे यांची सासुरवाडी देखील जळगावातील मुक्ताईनगरातील असल्याची माहिती आहे.

तेजस मोरे याचे नाव मध्यंतरी पुण्यातील एका भोसले बिल्डरच्या घोटाळ्यातही आले होते, अशी माहिती मिळाल्याचेही त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितले. तर एका महिला शेजाऱ्याने तो लहानपणी आमच्या घरी यायचा. स्वभावाने चांगला होता. मुलांसोबत खेळायचा आता पुढची त्याची काही माहिती नसल्याचे सांगितले. तेजस मोरे कोण? हा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात असून या प्रकरणात पुढे काय होणार? खरंच तेजस मोरेने दिलेल्या घड्याळात कॅमेरा होता का? सरकार आणि विरोधक काय भूमिका घेणार? असे अनेक प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहेत.