डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा व्हाइट कोट समारंभ उत्साहात
जळगाव लाईव्ह न्यूज । डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफच्या कोटचा रंग पांढरा असतो. याचा थेट संबंध रुग्ण आणि त्यांच्या सुरक्षिततेशी आहे. हे वैद्यकीय व्यवसायाचं प्रतीक मानले जातं. शिवाय याचा संबंध रुग्ण आणि त्या स्वच्छतेशी आहे. तसेच पांढरा रंग लक्ष वेधून घेतो. रुग्णालय हे गर्दीच्या ठिकाणांपैकी एक आहे. रुग्णालयात गर्दीच्या वेळी रूग्णांनी खचाखच भरलेल्या रूग्णालयाच्या आवारात तुम्ही पांढरर्या रंगाचा कोट घातलेले डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी सहज ओळखू शकता. यामुळे डॉक्टरांच्या कोटसाठी पांढर्या रंगाचा वापर केला जात असल्याचे प्रतिपादन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकिय संचालक डॉ. एन.एस. आर्विकर यांनी आज येथे केले.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अॅनाटॉमी विभागातर्फे एमबीबीएसच्या प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा व्हाइट कोट समारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून अशा प्रकारचा समारंभ घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. समारंभाच्या सुरूवातीला वैद्यकिय संचालक एन.एस.आर्विकर यांच्या हस्ते आरोग्य देवता धन्वंतरीचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.कैलास वाघ, अॅनाटॉमी विभागाच्या समन्वयिका डॉ. शुभांगी घुले वाघ, डॉ. माया आर्विकर, डॉ. रंजना शिंगणे, डॉ. दिलीप ढेकळे, डॉ निलेश बेंडाळे, डॉ. निलीमा पाटील, डॉ.राशिका सक्सेना, डॉ प्रशांत गुडेटटी, डॉ. पारीतोष ठाकूर, डॉ. मोहम्मद अब्दूला, डॉ. भवानी वर्मा, डॉ.चंद्रया कांते,डॉ. सी.डी सारंग,डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. विलास चव्हाण,रेक्टर सुरेंद्र गावंडे इ मान्यवर उपस्थित होते.
डॉ. एन.एस. आर्विकर यांनी पुढे बोलतांना सांगितले की, डॉक्टरांच्या पांढर्या रंगाच्या कोटचा संबंध रुग्णाच्या सुरक्षेसोबतही आहे. पांढर्या रंगाच्या कोटवर कोणत्याही प्रकारचे डाग सहज दिसतात. डॉक्टरांचं मूळ काम रुग्णावर उपचार करणे, हे असतं. डॉक्टर विविध रोगांची लागण झालेल्या रुग्णांना भेटून त्यांच्यावर उपचार करतात. डॉक्टरांना वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना भेटावं लागतं आणि अनेकवेळा जखमी रुग्णांवर उपचारही करावे लागतात. अशा वेळी डॉक्टरांचा विविध रोगांच्या विषाणूंसोबत संपर्क येतो. जेव्हा तुम्ही समाजात डॉक्टर म्हणून कार्य करू लागतात तेव्हा तुमची जबाबदारी वाढते. तसेच तुम्ही ज्या संस्थेतून शिक्षण घेतले त्या संस्थेचे तुम्ही प्रतिनीधीत्व करीत असतात. त्यामुळे वैद्यकीय शैक्षणिक वर्षात अभ्यासासह अंतर्गत मुल्यांकन तुम्हाला गांभीर्याने घ्यावे लागणार आहे. आज तुम्हाला दिलेला हा व्हाइट कोट हा तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. या संस्थेत तुम्हाला खुप उज्ज्वल भविष्य असल्याचेही डॉ.आर्विकर यांनी सांगितले.डॉ. प्रेमचंद पंडीत व प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांनी देखिल मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना व्हाइट कोट घालून गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्यावतीने मानसी राणे, सुनिध पानसे यांनी मनोगत व्यक्त केले. तर समारंभाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वैष्णवी वानखेडे, अमीत पाटील, राजनंदीनी पाटील, ऐश्वर्या लोकवानी, संस्कृती जाधव आणि पायल पाटील यांनी केले. याप्रसंगी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर्स उपस्थीत होते .