जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२४ । देशातील अनेक भागात तापमानात वाढ झालेली पाहायला मिळतेय. वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या जिवाची लाही-लाही होत आहे. मार्च महिन्यात अनेक ठिकाणी तापमानाने ४० शी पार केल्याने एप्रिल आणि मे महिन्यात तापमान कसे असेल असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार असल्याचे चित्र आहे.
भारतीय हवामान विभगाने एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात लक्षणीय वाढ होणार आहे, असा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार येत्या दोन महिन्यांत तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल. यासोबतच उष्णतेची लाटही सुरू होणार आहे.
हवामान विभगाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार यांना विचारण्यात आले की यावर्षी उन्हाळ्यात अपेक्षित तापमान किती असेल? याच प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, याबाबत काहीही बोलणे घाईचे तारू शकते. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार असल्याचे चित्र आहे. यासोबतच एप्रिल आणि मे महिन्यात उष्ण वारेही वाहू लागतील. ते म्हणाले, ‘येत्या एप्रिलमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील, असा अंदाज आहे. यासोबतच देशाच्या मध्यवर्ती भागातही उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे.
कुमार यांनी सांगितलं की, मे महिना हा या वर्षातील सर्वात उष्ण महिना ठरू शकतो, असा अंदाज आहे. तसेच उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताला मे महिन्यात तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागेल. पुढील तीन महिने अत्यंत उष्ण असणार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.दरम्यान, येत्या काही दिवसांत हवामान कसे असेल याची माहितीही त्यांनी दिली. नरेश कुमार यानीस अंगितलं की, ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम उत्तर-पश्चिम भारतात होऊ शकतो. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जळगावातील तापमानात घट :
दरम्यान काल शुक्रवारी जळगावसह काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. सकाळपासूनच जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. यामुळे शुक्रवार जळगावचे तापमान ३७ अंशावर राहिले होते. यापूर्वी या आठड्यात तापमान ४२ अंशावर गेलं होते. दरम्यान, आज जिल्ह्यात ३० ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.