जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । उत्तर कोल्हापूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत चंद्रकांत पाटलांनी उडी घेतली होती. चंद्रकांत दादांनी हिमालयात जाण्याचा शब्द फिरवल्याने कार्यकर्ते त्यांच्या पासून काय आदर्श घेतील असा सवाल उपस्थित करून बोलतांना भान ठेवूनच बोललं पाहिजे असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आ.एकनाथराव खडसे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.
गुजरातमधुन एका लग्न कार्यक्रमातून परतत असतांना त्यांनी आज नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या अध्यक्षांच्या घरी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजपच्या दिग्गज नेत्यांनी प्रचारात उडी घेतली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत २ तास जाहीर सभातून बोलत होते. प्रचारसभेत फडणवीस व चंद्रकांत पाटलांनी मतदारांवर घोषणांच्या पाऊस पाडला. भीष्मप्रतिज्ञा दिल्या तरीही मतदारांनी त्यांना साफ नाकारलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या हिमालय जाण्याच्या मुद्द्यावरून ते म्हणाले, निवडणूक हरल्यास हिमालयात देऊ असे चंद्रकांत पाटलांनी सांगितले होते. परंतु, ते आता दिलेल्या शब्दांपासून पळवाटा शोधत असल्याने त्यांच्यापासून त्यांचे भाजप कार्यकर्ते काय आदर्श घेतील असा खोचक सवाल उपस्थित करीत बोलतांना भान ठेवण्याच्या सल्लाही त्यांनी दिला.
राज्यात सध्या हनुमान चालीसा, मशीद आणि भोंगे याविषयावरून मोठा गोंधळ सुरु आहे. खडसे त्यावरून म्हणाले कि,हनुमान चालीसा वाजवण्यासाठी कोणतेही कायदे नाहीत. हनुमान चालीसाचे पठण हे केलेच पाहिजे तो हिंदू धर्माचा एक भाग आहे. मंदिरांमध्ये हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मर्यादा नाहीत. परंतु, एखाद्या मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा लावत असाल तर त्याठिकाणी तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दोन समाजात तेढ निर्माण होऊन त्याच्या पुढील कालावधीत समाजाला दुष्परिणाम भोगावे लागणार नाहीत याचे चित्र उभे राहता कामा नये असे शेवटी खडसे म्हणाले
कोल्हापूरचा विजय हा महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातुन महत्वाचा आणि राजकारणीची भावी दिशा ठरवणारा आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकदिलाने लढले तर कोणत्याही पक्षाचा पराभव करू शकतात यातून दिसून आले आहे. या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून भविष्यात अशाच पद्धतीने एकत्र चालण्याची गरज खडसेंनी व्यक्त केली आहे. या निवडणुकीत हिदुत्ववादाचा मोठा वापर केला गेला मात्र जनता सुज्ञ होती. भाजप हा हिदुत्वाचा वापर राजकारण आणि निवडणुकांपुरता करतो. त्यामुळेच त्यांचा हा आताताईपणा मतदारांनी नाकारल्याचे मत खडसेंनी व्यक्त केले.