⁠ 
सोमवार, जून 17, 2024

तुरीने गाठला १० हजाराचा टप्पा ; जळगावच्या बाजारात गहू, ज्वारी, मक्यासह हरभऱ्याचा दर काय?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२४ । एकीकडे बाजारात धान्याची आवक कमी होत असताना, दुसरीकडे तुरीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात ९ हजार ते ९ हजार ५०० रुपये दर असलेल्या तुरीच्या दरात वाढ होऊन तुरीचे दर १० हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मात्र, दर वाढले असले तरी शेतकऱ्यांकडे तूरच शिल्लक नसल्याने बाजार समितीमध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे.

तुरीला प्रचंड मागणी आहे. मात्र, आवक नसल्यामुळे तुरीच्या दरात वाढ झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव प्रमोद काळे यांनी दिली. जानेवारी महिन्यातदेखील तुरीचे दर हे १० हजारांपर्यंत गेले होते. मात्र, फेब्रुवारी व मार्च महिन्यात दर घसरून नऊ हजारांवर आले होते. सद्य:स्थितीत तुरीची आवक नाही. मात्र, लग्नसराई असल्याने तुरीला मागणी आहे. दरम्यान, अजून आगामी काही दिवसात तुरीच्या दरात वाढ होण्याचीही शक्यता आहे.

गहू, मक्याच्या दरात घट..
गव्हाचा हंगाम सुरू झाल्यानंतर गव्हाचे दर तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र, आवक जास्त वाढल्यामुळे दरात घट होऊन सद्यःस्थितीत बाजार समितीमध्ये गव्हाला २३०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत आहे. मक्याच्या दरातदेखील घट झाली असून, २३०० ते २५०० रुपयांवर गेलेले मक्याचे दर २ हजार ते २२०० रुपयांवर आले आहे. हरभऱ्याचे दर गेल्या महिनाभरापासून स्थिर आहेत. हरभऱ्याला ५२०० ते ५७०० रुपयांचा दर आहे. दादरच्या दरात मात्र वाढ झाली असून, जळगाव बाजार समितीत दादरचे दर २८०० ते ३२०० रुपयांपर्यंत आहेत.