जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२५ । राज्यातील अनेक ठिकाणी सध्या अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. तर राज्यात पूर्व मौसमी वारे सुद्धा सक्रिय झाल्याने मे महिन्यातील उन्हाळा पावसाळ्यात बदलले दिसून येत आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांत आजपासून चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या दरम्यान विजांचा कडकडाट होईल आणि 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहतील त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
जळगावात ढगाळ वातावरण
जळगाव जिल्ह्यातही मे च्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सध्या ढगाळ हवामानाचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे तापमानात सातत्याने घट होत असून उन्हाच्या झळा कमी झाल्या आहेत. आहेत गुरुवारी तापमान ३७.५ अंशांवर आले. आज जिल्ह्यात पावसाचा अंदाज नसून मात्र पुढील काही दिवस पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.