जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । यंदा मार्च महिन्याच्या पंधरवडा पासूनच राज्यासह जळगाव जिल्ह्यातील उन्हाचा पारा ४० अंशावर गेला. त्यानंतर एप्रिल महिन्यात त्यात वाढ होऊन जिल्ह्यातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानाने उसळी घेतली असून काल मंगळवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ४४ अंश नोंदवले गेले.
उष्णतेची ही लाट अजून ३० एप्रिलपर्यंत कायम राहून तापमान ४५ पर्यंत जाईल. म्हणजेच एप्रिलची अखेर जळगावकरांना ‘ताप’दायक ठरेल. यानंतर मे’ची सुरुवात ढगाळ वातावरणाने होणार असल्याने तापमानात काहीशी घसरण होणार आहे. १ आणि २ मे रोजी काहीशा ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी घसरेल.
यंदा १६ मार्चपासून जिल्ह्याच्या कमाल तापमानाने चाळिशी ओलांडली. यानंतर ६ रोजी जिल्ह्यात ४४ अंश एवढे सर्वोच्च तापमान नोंदवले गेले. या दिवशी किमान तापमान २५ अंश होते. यानंतर गेल्या आठवड्यात अंशतः ढगाळ वातावरणामुळे पारा काहीसा घसरून ४० अंशावर आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा तापमानाचा पारा वाढून ४४ अंशावर गेला आहे. जिल्ह्यात केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीही उष्ण वारे वाहत असल्याने किमान तापमान सरासरी ३ ते ४ अंशांनी वाढले.
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी उन्हाचा पारा उच्चांकी पातळीवर होता. काल दिवसभरात उन्हाचा पारा ४४ अंशांवर होते. मार्चपासून चढ्या तापमानाने पोळणाऱ्या जिल्ह्यासाठी एप्रिलदेखील मे हीटची अनुभूती देणारा ठरला. कारण, एप्रिलमध्ये यापूर्वी उष्णतेच्या दोन लाटांचा सामना करावा लागला. यानंतर महिन्याच्या शेवटी पुन्हा तिसऱ्या लाटेचा इशारा आहे. यादरम्यान कमाल तापमान ४४ ते ४५ अंश, तर किमान तापमान २४ ते २७ अंश असेल. उष्णतेचा प्रकोप पाहता घराबाहेर पडताना उष्माघातापासून बचावाची काळजी घ्यावी.
जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?
वेळ – अंश
१० वाजेला – ३८ अंश
११ वाजेला – ४० अंश
१२ वाजेला – ४२ अंश
१ वाजेला- ४२ अंशापुढे
२ वाजेला – ४३ अंश
३ वाजेला – ४३ अंशापुढे
४ वाजेला – ४२ अंश
५ वाजेला – ४१ अंश
६ वाजेला – ३९ अंश
७ वाजेला – ३७ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३५ अंशावर स्थिरावणार.