जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून असलेला थंडीचा जोर काहीसा ओसरला असून किमान तापमानात वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी ९ अंशांवर असलेले रात्रीचे तापमान रविवारी १५ अंशावर आले होते. केवळ दोन दिवसांत जळगावच्या रात्रीच्या तापमानात ६ अंशांची वाढ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात २४ ते २७ डिसेंबरपर्यंत थंडी कमी होऊन किमान तापमान २० अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून यादरम्यान तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत हाडे गोठवणाऱ्या थंडीने जळगावकर त्रस्त झाले होते. जळगावचे तापमान ७ अंशांपर्यंत खाली आले होते. मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून तापमानात बदल दिसून आला. भूमध्य समुद्र आणि आसपासच्या प्रदेशातून येणारे हवामानातील विक्षोभ तसेच पूर्वेकडील दमट वाऱ्यांमुळे जळगावातील वातावरणात बदल झाला. गेल्या दोन दिवसात रात्रीच्या तापमानात मोठी वाढ झाली.
शनिवारी रात्रीचा पारा ११ अंशांवर होता. रविवारी त्यात वाढ होऊन पारा १५ अंशांपर्यंत वाढला होता. येत्या तीन दिवसांत ते पाच अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर काहीअंशी कमी झाला आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, दुसरीकडे जिल्ह्यात २४ ते २७ डिसेंबर दरम्यान तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच २८ आणि २९ डिसेंबरला पारा १२ अंशांवर घसरण्याची शक्यता आहे. नव्या वर्षातही संमिश्र वातावरण राहील, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.
आठवडा राहणार असा
२४ डिसेंबर : किमान -१८, कमाल -२९
२५ डिसेंबर : किमान -१९, कमाल -३१
२६ डिसेंबर : किमान -२०, कमाल -३२
२७ डिसेंबर : किमान -१५, कमाल – ३१
२८ डिसेंबर : किमान -१२, कमाल – ३०
२९ डिसेंबर : किमान -१२, कमाल – २९
३० डिसेंबर : किमान -१३, कमाल – ३०