जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२५ । जळगाव जिल्ह्यात सध्या उन्हाच्या झळा लागल्या असून तापमानाचा पारा चाळीशीच्या वर गेल्याने जिल्हावासीय वाढत्या उष्णतेने हैराण झाले आहेत. उन्हाची तीव्रता वाढताच जळगाव जिल्ह्यातील अनेक धरणांमधील जलसाठा गेल्या महिन्याभरात जवळपास १० टक्क्यांनी घसरला आहे.

दि. १० मार्च ५५.१३ टक्के जलसाठा असताना १० एप्रिल रोजी हा साठा ४५.७५ टक्क्यांवर आला आहे; मात्र गिरणा, हतनूर, वाघूर धरणातील जलसाठा पुरेसा असल्याने यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईवर सहज मात करता येणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
गेल्यावर्षी १० एप्रिल रोजी ४० टक्के जलसाठा होता, भोकरबारी मन्याड आणि शेळगाव बॅरेजमधील जलसाठा शून्यावर गेला होता. तर अग्नावती, हिवरा, बोरी धरणातील जलसाठा पूर्णतः आटण्याच्या स्थितीत आला होता. यंदा मात्र एकही प्रकल्पाचा जलसाठा शून्यावर आलेला नाही. केवळ भोकरबारी धरणातील जलसाठा ४ टक्क्यांवर आला आहे. तसेच हतनूरमध्ये ५१.३७, गिरणात ३६.५३ तर वाघूरमध्ये ७८.५० टक्के जलसाठा आहे. त्यामुळे अर्ध्या जिल्ह्याची तहान पुरविणाऱ्या धरणाच्या माध्यमातून यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नसल्याचा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी गिरणा धरणातील जलसाठा २६.८७ टक्के असतानाही पाणीटंचाईवर बऱ्यापैकी मात करता आली होती.
गिरणा चार प्रकल्प ७० टक्क्यांवर
वाघूर, सुकी, अभोरा, मोर या चार प्रकल्पातील जलसाठा एप्रिलच्या मध्यान्हातही ७० टक्क्यांवर आहे. त्यामुळे या प्रकल्प क्षेत्रात सिंचनाला वाव आहे.