⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

जळगावकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात मोठी वाढ, असा आहे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा?

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२३ । यंदा म्हणावा तसा पाऊस झालेला नाहीय. जून महिन्यानंतर ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात पाऊस अत्यंत कमी झाला. जुलै महिन्यात झालेल्या पावसाने खरिपाची पेरणी झाली मात्र जिल्ह्यात पावसाने तीन महिने उलटून गेल्यानंतरही काही धरणात गतवर्षीपेक्षा जलसाठा खूपच कमी झाला होता. यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागते की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता.

मात्र जिल्ह्यात या महिन्यात आतापर्यंत सात ते दिवसात १५४.२ मिलीमिटर पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत चांगला पाणी साठा झाला असून, पाणी टंचाई मिटण्याच्या मार्गावर आहे.

विशेषतः जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात सध्या ८२.७५ टक्के पाणी साठा आहे. परिणामी शहराची पाणी टंचाई मिटली आहे. खरिप हंगामात उत्पादनात घट असली, तरी चांगल्या सिंचनामुळे रब्बी हंगामात चांगले उत्पादन येण्याची आशा निर्माण झाली आहे.

धरणात गतवर्षीपेक्षा कमी साठा
गतवर्षी चांगला पाउस झाला होता. यामुळे गिरणा धरण आजच्या दिवशी (१८ सप्टेंबर २०२२) शंभर टक्के भरले होते. त्या तुलनेत यंदा मात्र गिरणा धरणात ५४.३९ टक्केच पाणीसाठा आहे. हतनूर धरणात गतवर्षी ६९.३३ टक्के जलसाठा होता.

यंदा ५२.१६ टक्के, तर वाघूर धरणात गतवर्षी ८४.७१ टक्के जलसाठा होता. यंदा तो ८३ टक्के आहे. यासोबतच काही लहान प्रकल्पही शंभर टक्के भरली आहेत. इतर प्रकल्पांतही जलसाठा होत आहे. यामुळे रब्बीच्या हंगामाला याचा फायदा होणार आहे.

दरम्यान, अद्याप परतीचा पाऊस यायचा बाकी असून याबाबत हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. या महिन्याच्या अखेरीस मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एकंदरीत परतीचा पाऊस चांगला झाला, तर जिल्ह्यातील अन्य प्रकल्पांमधील साठा वाढू शकतो.

धरणातील पाणीसाठा असा?
धरणाचे नाव टक्केवारी
हतनूर ५२.१६
गिरणा ५४.३९
वाघूर ८२.७५
अभोरा १००
मंगळूर १००
सुकी १००
तोंडापूर १००
मोर ९१.५८
अग्नावती ००.००
मन्याड ००.००
बहुळा १४.९४
हिवरा ००.००
अंजनी ६९.५६
गुळ ८०.४१
भोकरबारी ०३.२९
बोरी १६.४३.