जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२५ । गेल्यावर्षी दमदार पाऊस झाल्याने सर्वच प्रकल्प तुडुंब भरले होते. त्यामुळे उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार नाही, असे चित्र सुरुवातीला होते. मात्र, एप्रिलच्या मध्यानंतर जळगाव जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठा ओसरत गेला. सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ३९. ४२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. असं असले तरी गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात असणाऱ्या प्रकल्पातील जलसाठा ५ टक्क्यांनी जास्त असल्याने काहीसे दिलासादायक चित्र आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीलाच बोरी धरणातील जलसाठा शून्यावर आला आहे. तर भोकरबारी धरणातील जलसाठा अखेरची घटका मोजत आहे. भोकरबारी धरणात १ टक्के साठा आहे. तर अन्य सर्वच प्रकल्पांमधील जलसाठा १५ ते ७६ टक्क्यांदरम्यान आहे. हतनूर, गिरणा, वाघूर धरणात मात्र जलसाठा समाधानकारक आहे. त्यामुळे या प्रकल्पांवर अवलंबून असणाऱ्या पाणी योजनांना जुलै महिन्यापर्यंत कुठलीही अडचण येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान गेल्यावर्षी १ मे रोजी जिल्ह्यातील जलसाठा ३४.७८ टक्के इतका होता. यंदा मात्र हा जलसाठा ३९.४२ टक्के इतका आहे. मात्र, गेल्यावर्षी मन्याड, बोरी, शेळगाव बॅरेज, भोकरबारी, अग्नावती या पाच प्रकल्पांतील जलसाठा शून्यावर गेला होता.
सुकी धरणात सर्वाधिक जलसाठा
रावेर तालुक्यातील सुकी धरणात सर्वाधिक जलसाठा आहे. सध्या या धरणात ७६.९९ टक्के जलसाठा आहे. त्यापाठोपाठ जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात ७४.५१ टक्के जलसाठा आहे. यामुळे जळगावकरांचा पावसाळ्यापर्यंत पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
सद्यस्थितीत उपलब्ध असलेला प्रकल्पनिहाय जलसाठा :
हतनूर – ४४.१६टक्के
गिरणा – २८.७२ टक्के
वाघूर – ७४.५१ टक्के
अभोरा – ७०,०४ टक्के
मंगरूळ- ४६.२८ टक्के
हिवरा – १६.३१ टक्के
सुकी – ७६.९९ टक्के
मोर –६८.१९ टक्के
बहुळा – ३१.२९ टक्के
अग्नावती – १७.२१टक्के
तोंडापूर – २५.६६ टक्के
अंजनी – ३१.६८ टक्के
गूळ – ६५.७३ टक्के
बोरी – ०० टक्के
भोकरबाडी : १.२२ टक्के
मन्याड – २२.२९ टक्के
शेळगाव बॅरेज – २२.९२ टक्के