जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२३ । बदलत्या हवामानामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झालं असून या नुकसानीतून शेतकरी सावरत नाही तोवर राज्यात पुन्हा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 ते 3.1 किलोमीटर उंचीदरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. त्यामुळे राज्यावरही ढगांची दाटी झाली असल्याने पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे.
काल शनिवारी राज्यातील काही भागात गारपीटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांची रब्बीची पिके शेतात उभी असून, काहींनी पिके काढून गंजी लावली आहे. त्यामुळे या अशा पिकांचे देखील अवकाळीमुळे मोठं नुकसान झाले आहे.
आज पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात 10 एप्रिलपर्यंत गारपीटीसह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
वादळी पावसाचा इशारा
मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव
विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली