जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

जानेवारी 18, 2026 7:50 PM

बोगस मतदानाचा संशय, मतदाराला मारहाण केल्याने गुन्हे दाखल

vishnu bhangale

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहर महानगर पालिका निवडणुकीत महायुतीचा डंका वाजला असून महापौर महायुतीचा होणार आहे. गट स्थापन केल्यानंतर याबाबत सर्व नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. निवडणुकीत जनतेने माझ्याबाजूने, विकासाला कौल दिला आहे. मतदानाच्या दिवशी जो प्रकार घडला आणि माझ्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी दिली आहे.

Advertisements

प्रभाग ५ मधून विजयी झाल्यानंतर नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विष्णू भंगाळे म्हणाले की, जळगावात महायुती म्हणून आम्ही लढलो आणि आम्हाला भरपूर यश मिळाले. जनतेने आम्हाला विश्वासाने निवडून दिले आहे. आम्ही आमचे नेते गुलाबराव पाटील आणि महायुतीचे सर्व नेते, आमदार यांच्या माध्यमातून भरघोस निधी आणून जळगाव शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विरोधकांनी खोटे बोलावे पण रेटून बोलावे असे करून टीका केली. निवडणूक आता पार पाडली असून झालेला विषय आम्ही सोडून दिला आहे, असे विष्णू भंगाळे यांनी सांगितले.

Advertisements

जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान आर. आर. विद्यालय मतदान केंद्रावर गुरुवारी दुपारी मोठा राडा झाला. बोगस मतदान करीत असल्याच्या संशयावरून अपक्ष उमेदवार अॅड.पीयूष नरेंद्र पाटील यांनी एका मतदाराला मतदान केंद्राबाहेर ओढून आणत कमरेत लाथ घालून मारहाण केली. फिर्यादी सुनील श्रीधर भंगाळे (रा. वाघळी, ता. चाळीसगाव) यांना मारहाण करण्यात आली होती. या राड्यामुळे सुनील भंगाळे आणि त्यांचे सहकारी पराग लक्ष्मण पाटील हे मतदानापासून वंचित राहिले. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहनाची तोडफोड, गुन्हा दाखल
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा नवनिर्वाचित नगरसेवक विष्णू भंगाळे यांच्या वाहनावर शुक्रवारी मध्यरात्री दगडफेक करून मागील काच फोडून नुकसान करण्यात आले. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चालकाने दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार नगरात राहणारे भंगाळे यांच्या घराशेजारी असलेल्या पार्किंगमध्ये नेहमीप्रमाणे कार (क्र. एमएच ३९, एबी ९९९९) उभी करण्यात आली होती. गणेश भानुदास भोळे (रा.श्रद्धा कॉलनी) यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now