जळगाव लाईव्ह न्यूज |17 सप्टेंबर 2024 | आरोग्यदूत रामेश्वर नाईक हे नामदार गिरीश महाजन यांचे जामनेर विधानसभा मतदारसंघातील राजकीय उत्तराधिकारी राहतील, अशी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बाबत जळगाव लाईव्ह न्यूजने रामेश्वर नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हा विरोधकांचा खोडसाळपणा असून जामनेर विधानसभा मतदारसंघात गिरीश भाऊंना पर्याय नाही. विरोधकांना आतापासूनच पराभव दिसू लागला असल्याने त्यांनी असे प्रकार सुरू केले असल्याचे त्यांनी जळगावला लाईव्ह न्यूज सोबत बोलतांना सांगितले.
श्री. नाईक म्हणाले की, गिरीशभाऊ हे केवळ जळगाव जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे नेते आहेत. गिरीशभाऊंच्या नेतृत्वाखाली जामनेर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहे आणि आता विरोधकांना हा विकास डोळ्यांनी पाहिला जात नाही. विरोधकांना त्यांचा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने आता ते खोटे आरोप व असे प्रकार करताना दिसत आहेत. माझ्या नावाने सोशल मीडिया वर व्हायरल झालेल्या मेसेज हा त्यातलाच एक प्रकार आहे. मी आरोग्य क्षेत्रात काम करणारा भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. पक्ष व गिरीशभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली माझे अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. मात्र विरोधकांनी त्याचा राजकारणाशी संबंध जोडत हा खोटं मेसेज व्हायरल करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.
जामनेर विधानसभा मतदारसंघात गिरीशभाऊ यांच्याशिवाय शिवाय पर्याय नाही हे विरोधकांना देखील माहित आहे. मात्र आता त्यांना अशा खोट्या मेसेजचा सहारा घ्यावा लागत आहे याचा अर्थ त्यांनी आतापासूनच पराभव मान्य केला आहे. कार्यकर्त्यांनी अशा कोणत्याही खोट्या मेसेज कडे लक्ष देऊ नये. आगामी विधानसभा मतदारसंघात आपल्याला गिरीशभाऊंना विक्रमी मताधिक्यांनी विजयी करायच आहे, असे रामेश्वर नाईक जळगावला लाईव्ह न्यूज सोबत बोलतांना म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्यभरात आरोग्य शिबिरांचे काम सुरू आहे आणि मी त्यात व्यस्त आहे. सर्वसामान्यांचे आरोग्य सेवा संबंधीच्या प्रश्नांना माझे प्रथम प्राधान्य आहे. यामुळे अशा प्रकारच्या खोडसाळपणाकडे पाहण्यास मला वेळ नाही, असेही रामेश्वर नाईक यांनी नमूद केले.