जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२१ । भडगाव तालुक्यातील शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम कजगाव येथे भडगाव पंचायत समितीच्या वतीने दि ३० रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात गुणवत्ता विकास कमी सहजयोग चे धडे जास्त देण्यात आल्याचे कळते . कार्यक्रमात विनाकारण मोठ्या संख्येने शिक्षकांची गर्दी जमवून कोविड नियमांचा फज्जा उडाला. आता यावर प्रशासन काय कार्यवाही करते हे पहाणे अपेक्षित आहे .

एकीकडे महाराष्ट्र शासन तिसरी लाट टाळण्यासाठी व्यापारी व नागरिकांवर निर्बंध लादत आहे. तर प्रशासन नियमांची सक्ती करून सामान्य जनतेला वेठीस धरून कारवाईचा बडगा उगारत आहे.तो कायद्याचा बडगा प्रशासन या कार्यक्रमाच्या आयोजकांवर उगारणार का अशी चर्चा आज भडगाव येथे सुरू आहे.
शासनाने नुकतीच शाळा सुरू करून शिक्षकांच्या ५०% उपस्थितीतीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला . मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून शालेय वेळेत असा कार्यक्रम आयोजन करणे गरजेचे होते का ? असे शिक्षकांमध्ये चर्चिले जाते आहे.
कार्यक्रम भडगाव ऐवजी कजगाव लाच का?
हा कार्यक्रम भडगाव येथे घेणे सोयीचे असतांना शिक्षकांना वेठीस धरून तालुक्याच्या एका बाजूला दूर घेण्याचे प्रयोजन काय ? कार्यक्रम आयोजनात आयोजकांनी सक्षम अधिकारी कडून परवानगी घेतली होती का? जर घेतली असे तर मंगल कार्यालायाला एवढी मोठी लोकांची गर्दीच्या कार्यक्रमास कारणीभूत ठरवून प्रशासन काय कार्यवाही करणार आहे.
कजगावच्या नागरिकांना कोविडची लागण झाल्यास जबाबदार कोण?
गुणवत्ता विकास कार्यक्रम मुळे कजगाव येथे मोठ्या संख्येने शिक्षकांची गर्दी बघायला मिळाली. या गर्दी मुळे उपस्थित शिक्षक व कजगाव गावातील नागरिकांना कोविड झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा सवाल ही उपस्थित होत आहे.
या कार्यक्रमात मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील , जि.प.शिक्षण सभापती रवींद्र पाटील, सभापती अर्चना पाटील, यासह तालुक्यातील अन्य जबाबदार पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते . लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत शासकीय कोविड नियमांचे उल्लंघन होऊनही त्यांच्या दबावामुळे सर्वसामान्य जनतेवर कार्यवाहीचा सूड उगवणारे प्रशासन यावर कार्यवाही करणार नाही. अशी चर्चा कार्यक्रमात होती . सामाजिक,राजकीय कार्यक्रम, आंदोलनात तात्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी पुढाकार घेणारे प्रशासकीय अधिकारी, जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाचोरा उपविभागीय अधिकारी, भडगाव पोलीस निरीक्षक हे शासनाच्या परिपत्रका नुसार कार्यवाही करणार का? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
स्थानिक सरपंचांची अनुपस्थितीत
हा कार्यक्रम पंचायत समितीच्या आयोजनातून असल्याने व कजगाव गावी होत असल्याने येथील महिला लोकनियुक्त सरपंचांच्या अनुपस्थितीमुळे त्यांना सदर कार्यक्रमातुन जाणीव पूर्वक डावलले की काय अशही चर्चा आहे.