⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | व्हिडीओ सोलापूरचा व्हायरल, चर्चा अन् प्रतिक्षा जळगावच्या व्हिडीओची!

व्हिडीओ सोलापूरचा व्हायरल, चर्चा अन् प्रतिक्षा जळगावच्या व्हिडीओची!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा बेडरुममधील महिलेसोबतचा खळबळजनक व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राज्यात एकच खळबळ उडाली. राजकीय नेते आणि बंद रूम व्हिडीओ काही नवीन राहिलेले नाही. सोलापूरचा व्हिडीओ अनपेक्षित असला तरी जळगाव जिल्हावासीय नागरिक आणि विशेषतः राज्यातील राजकारण्यांना दुसऱ्याच व्हिडिओची जास्त प्रतिक्षा आहे. जळगावकर गेल्या काही वर्षापासून ऐकत असलेली ‘ती’ बहुप्रतिक्षीत सीडी काही बाहेर आलीच नाही, गेस्ट हाऊसला काही घडले तर सिद्धच झाले नाही, एका आमदाराचे कानावर येणारे किस्से केवळ किस्सेच राहिले असून केव्हा बॉम्ब पडणार आणि सर्वांचे पत्ते उघड होतील याची प्रतिक्षा लागून आहे.

सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांची एका महिलेसोबत असलेली ऑडिओ क्लीप काही दिवसापूर्वी व्हायरल झाली होती. देशमुख महिलेशी आदरपूर्वक बोलत होते तर समोरील महिला धमकीच्या सुरात आरोप करीत असल्याचे अनेकांनी ऐकले. देशमुख यांनी हनी ट्रॅपचे नाव सांगत याप्रकरणी पंधरा दिवसापूर्वीच गुन्हा दाखल केला होता. नुकतेच एक व्हिडीओ समोर आला असून त्यानंतर इतर देखील व्हिडीओंना राष्ट्रवादीकडून उजाळा दिला जात आहे. पक्षाचे नाव येताच भाजपचे वरिष्ठ नेते मंडळी खडबडून जागे झाले आहेत. वरिष्ठांच्या सुचनेनंतर श्रीकांत देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तो मंजूर करीत दुसऱ्याकडे पदभार देखील सोपविला आहे.

नेते आणि त्यांच्या चारित्र्यावर होणारे आरोप हे काही नवीन नाही. अनेकांचे अनेक व्हिडीओ, फोटो, ऑडिओ समोर आले तर अनेकांवर अत्याचाराचे आरोप झाले. एखादे प्रकरण उघड झाल्यावर काहींचे राजकीय भविष्यच काळवंडले तर काहींचे एका ब्रेकनंतर पुन्हा सुरळीत झाले. जळगाव जिल्ह्याला देखील नेत्यांवरील आरोप आणि व्हिडीओ काही नवीन नाही. जळगावच्या कुप्रसिद्ध सेक्स स्कँडलमध्ये नाव आलेले दिग्गज राजकारणी, जळगावच्या एका नेत्याचे नाशिक गेस्ट हाऊस प्रकरण, माजी खासदारांचे व्हायरल झालेले व्हिडीओ, जेष्ठ नेते एकनाथराव खडसे वारंवार उल्लेख करीत असलेली ‘ती’ सीडी, अलीकडच्या काळात जोरदार चर्चा झालेले अजिंठा विश्रामगृह प्रकरण, एका आमदाराचे वारंवार कानावर येणारे किस्से अशा कितीतरी गोष्टी जळगावकरांना ज्ञात आहेत.
हे देखील वाचा : काय ते हाटील, काय ती महिला, काय तो Video.. भाजप नेत्याचा महिलेसोबतचा बेडरूम व्हिडीओ व्हायरल

एकनाथराव खडसेंनी तर आजवर इतक्या वेळा सीडीचा उल्लेख केला आहे कि भाजप नेते गिरीश महाजनांनी त्यांना थेट सीडी लावण्याचे आव्हानच देऊन टाकले. खडसे, सीडी आणि महाजन हे म्हणजे एक गमतीचा भाग होऊन बसले आहे. कुणीही यावे आणि टपली मारून जावे असे काहीसे या प्रकरणात वाटत आहे. कोण नेता मध्यंतरी लोणावळा गेला आणि मालिश करून आला याची देखील चर्चा रंगली होती. माजी खा.ए.टी.पाटलांच्या खाजगी क्षणांचे फोटो सोशल मिडियात नेमके निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल झाले होते आणि व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली होती. नाना खासदारकीच्या स्पर्धेतून बाहेर तर पडले परंतु फोटो व्हायरल करणारे काही समोर आले नाही.

जळगावात देखील अशा काही व्हिडिओंची चर्चा गेल्या चार वर्षापासून रंगत आहे. कुणाचा व्हिडीओ समोर येणार, कधी येणार हे काही निश्चित नसले तरी जे समोर येईल ते जळगाव सेक्स स्कँडलपेक्षा कमीच असेल हे मात्र निश्चित आहे. आज सोलापूरच्या भाजप जिल्हाध्यक्षांच्या व्हिडीओचे निमित्त मात्र असले तरी जळगावच्या व्हिडिओंचे चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. राजकीय डावपेच खेळण्यासाठी बऱ्याचदा असे फंडे शोधले जातात. अलीकडच्या काळात तर हनीट्रॅपचा प्रकार चांगलाच चर्चेत आहे. एखाद्याला अडकविण्यासाठी महिलेच्या माध्यमातून लावलेला पद्धतशीर गेम म्हणजेच हनीट्रॅप. येणाऱ्या काळात विशेषतः विधानसभा निवडणुकीपूर्वी असेच काही राजकीय लोकांचे व्हिडीओ समोर येतील आणि त्याला हनी ट्रॅपचे नाव दिले जाईल अशी शक्यता नाकारता येत नाही.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.