खुशखबर! मुंबई-पुण्याहून शेगावसाठी वंदे भारत ट्रेन्स धावणार ; जळगाव, भुसावळ स्थानकांवर मिळणार थांबा?
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२४ । देशातील विविध भागात वंदे भारत एक्स्प्रेस धावत असून देशभरात या ट्रेनला चांगला प्रतिसादही मिळत आहे. वंदे भारत ट्रेन ही वेगवान प्रवास आणि आरामदायी सुविधांमुळे प्रवाशांच्या पसंतीला उतरली आहे. दरम्यान, लवकरच मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव मार्गावर दोन वंदे भारत ट्रेन्स सुरू होणार असून त्यासंदर्भातील अधिसूचनेचा प्रस्तावही मध्य रेल्वेकडून मागवण्यात आल्याची माहिती आहे. विशेष ही ट्रेन भुसावळ मार्गे धावणार आहे.
यामुळे गजानन महाराजांच्या भक्तांसाठी ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागणार असून आता शेगावचा प्रवास सुखकर आणि जलद होणार आहे. विदर्भाची पंढरी म्हणून संत गजानन महाराज यांचे श्रीक्षेत्र शेगावची ओळख आहे. देशभरातून दररोज हजारो भाविक शेगावला जाऊन गजानन महाराजांच्या चरणांचं दर्शन घेतात. मात्र, प्रवासासाठी त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो.
हीच बाब लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने शेगावसाठी दोन वंदे भारत टेन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबईहून शेगाव आणि पुण्याहून शेगावसाठी वंदे भारत ट्रेन्स धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सध्या रेल्वे मंत्रालय मे २०२४ पर्यंत देशातील लोकप्रिय तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या ३० ते ३५ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवण्याच्या योजनेवर काम करत आहे. यामध्ये गजानन महाराज यांचे श्रीक्षेत्र शेगावचा देखील समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, मध्य रेल्वेमार्गावर जळगाव व भुसावळ ही महत्त्वाची जंक्शन स्थानके आहेत. या स्थानकांवरुन शेगावी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ‘वंद भारत ट्रेन’ला या दोन्ही स्थानकांवर थांबा मिळण्याचीही शक्यता आहे.