जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जून २०२२ । महाराष्ट्र शासनाच्या जळगाव जिल्हा महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली सूर्यकांत विसपुते यांची नियुक्ती झाली असून महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील विविध जिल्ह्यांच्या अध्यक्ष आणि सदस्यांची यादी अधिसूचनेद्वारे जाहीर केली आहे.
महिला व बाल कल्याण समिती ही १७ वर्षाखालील काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांच्या सर्वांगीण विकास, पुर्नवसन आणि सर्वच स्तरावर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 – नुसार प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून असलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हास्तरावर काम पाहते. दर तीन वर्षांनी कार्यकाळ संपल्यावर नवीन समिती गठीत करण्यात येते. शासनातर्फे नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय मंडळाकडून मुलाखत घेऊन समिती सदस्यांची नियुक्ती केली जाते.
निधी फाऊंडेशनद्वारे गेल्या १० वर्षापासून वैशाली सूर्यकांत विसपुते या ‘मासिक पाळी, कापडमुक्त अभियान’च्या माध्यमातून महिला आणि मुलींसाठी कार्य करीत आहे. स्वच्छता अभियानाच्या त्या ब्रँड अँबेसेडर देखील असून जिल्ह्यात यापूर्वी विविध पदांवर आणि शासकीय समित्यांवर त्यांनी काम पाहिले आहे. जळगाव शहरात महिला स्वच्छतागृहे उभारण्यासाठी त्यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. शासन आणि विविध संस्थाकडून त्यांना गौरविण्यात आले आहे.
राज्यशासनाने जळगाव जिल्ह्याच्या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून देवयानी मनोज गोविंदवार यांची तसेच सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते वैशाली सूर्यकांत विसपुते, संदीप निंबाजी पाटील, विद्या रवींद्र बोरनारे, वृषाली श्रीपाद जोशी यांची नियुक्ती केली आहे.