जळगाव शहरातील ‘या’ आठ केंद्रांवर आज होणार लसीकरण
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२१ । जिल्ह्याला गेल्या सहा महिन्यांतील सर्वाधिक मोठा लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. तब्बल ४९ हजार लसींचे डोस गुरुवारी प्राप्त झाले आहे. त्यामुळे आज शुक्रवारी जिल्ह्यातील बहुतांश केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे. शहरात महापालिकेच्या ७ तर सिव्हिलच्या १ अशा आठ केंद्रांवर लसीकरण होणार आहे.
गुरुवारी जिल्ह्याला ३१ हजार कोविशील्ड व १८ हजार काेव्हॅक्सिन अशा एकूण ४९ हजार लसींचे डोस प्राप्त झालेत. यापूर्वी आरोग्य संचालकांनी जिल्ह्याला जादा लस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रथमच ४५ हजार लस मिळाले होते. त्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीचे डोस मिळाले आहेत. त्यांचे वाटप जिल्ह्यातील एकूण ११६ केंद्रांना करण्यात आले आहे..
महापालिकेच्या केंद्रासाठी व सिव्हिलच्या केंद्रांसाठी कोविशील्ड व कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी पंधराशे डोस असे एकूण ६ हजार डोस शहराला प्राप्त झाले आहे. यानुसार महापालिकेच्या शाहू हॉस्पिटलला (पहिला व दुसरा डोस), डी. बी. जैन हॉस्पिटल, शाहीर अमर शेख हॉस्पिटल, का. ऊ. कोल्हे विद्यालय, मनपा शाळा क्रमांक ४८ या ४ केंद्रावर १८ वर्षांवरील लाभार्थींना कोविशिल्ड लसींचा दुसरा तर नानीबाई अग्रवाल रुग्णालयात ४५ वर्षावरील लाभार्थींना दुसरा डोस मिळेल. चेतनदास मेहता रुग्णालयात १८ वर्षांवरील लाभार्थींना कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस मिळणार आहे.