जळगाव लाईव्ह न्यूज । 17 मार्च 2024 । सध्या राज्यातील वातावरणात सतत बदल होताना दिसत आहे. कधी उन्हाचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण. एकीकडे राज्यातील अनेक शहरांचा तापमानाचा पारा 35 ते 37 अंशादरम्यान गेल्याने उन्हाच्या झळा बसत आहे. यातच दुसरीकडे राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने विदर्भातील काही भागात अवकाळी पाऊस तसंच गारपिटीची शक्यता वर्तवली आहे.
राज्यात अवकाळीचं सावट कायम आहे. शेतकऱ्यांच्या अगदी तोंडचं पाणी पळालं आहे. अशातच आता हवामान विभागाकडून आज (17 मार्च) नागपूर सह भंडारा-गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागपुरमध्ये 17 मार्च आणि 19 मार्चला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वर चढत आहे.
16 मार्च रोजी पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत. दुपारी अचानक वातावरणात बदल होत नागपूरात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस झाला.
जळगावात कशी राहणार स्थिती?
दरम्यान, जळगावात अवकाळी पावसाचा अंदाज नसला तरी शनिवारी काहीसा प्रमाणात ढगाळ वातावरण होते. मात्र तापमानात वाढ होत आहे. शनिवारी पारा ३६.६ अंशांवर होता. तो आज रविवारी दोन अंशांनी वाढून ३८ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सुटीचा दिवस प्रचंड तापदायक ठरू शकतो. रविवारी दिवसाच्या वेळेस हवेची कमाल गती तशी ३२ किलोमीटर प्रतितास राहणार आहे. आकाश निरभ्र राहील. वाऱ्याचा वेगही मध्यम राहील, असा अंदाज हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी अभ्यासकांनी वर्तवलेला आहे.