जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२५ । देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5.33 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान .”देवगिरी बँकेने राजकीय संगनमतातून, सूडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल केला असून या प्रवृत्ती विरुद्ध आम्ही लढू आणि यांना गाडू अशी प्रतिक्रिया उन्मेष पाटील यांनी दिली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर उन्मेष पाटील यांनी प्रतिक्रिया देत मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. “मंगेश चव्हाण, गिरीश महाजन, बँकेचे चेअरमन, बँकेचे एमडी, बँकेचे मॅनेजर, रिकवरी ऑफिसर यांचे CDR आर तपासा, अशी मागणी उन्मेष पाटलांनी केली.

”देवगिरी बँकेने राजकीय संगनमतातून, सूडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल केला असून बँकेने ज्या कंपनीला कर्ज दिलं, त्या कंपनीच्या संचालक मंडळात मी नाही, मी त्या कंपनीचा कुठलाही भागीदार नाही. मी जामीनदार होतो आणि म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मला नंबर एकचा आरोपी करण्यात आलं आहे” असं उन्मेष पाटील आपली बाजू मांडताना म्हणाले.

“मी या कंपनीचा कुठलाही भाग नसताना, राजकीय द्वेषातून माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मला विचारायचं आहे, गिरीश महाजन यांच्या कुटुंबाच्या नावाने बी. एच. आर. चे ॲसेट खरेदी केले जातात, ठेवीदारांच्या पैशातून रुपयाच्या वस्तू माफक दरात खरेदी केल्या जातात. त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. वरद इन्फ्रा चाळीसगावच्या आमदारांची कंपनी आहे तसेच सुप्रीमो कंपनी टॅक्स, ॲसेट नाही, तरी शेकडो कोटीच्या जमिनी माफक दराने कशा घेतात? त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही का?” असे प्रश्न उन्मेष पाटील यांनी विचारले आहेत.
देवा भाऊ हा न्याय कुठला?
“वरद इन्फ्राला तीन-चार कोटीच्या व्हॅल्युएशन असलेल्या ॲसेट आधारावर याच बँकेने 12 कोटीचे कर्ज दिले, त्यावर गुन्हा दाखल होत नाही. मी जामीनदार होतो, कर्जाच्या पाचपट माझ्या प्रॉपर्टी अटॅच केल्या आहेत. कर्जाच्या 10% व्हॅल्युएशन नसणाऱ्यांना दहापट कर्ज दिले जातं. देवा भाऊ हा न्याय कुठला? जेव्हा मी बी.एच.आर. वर बोलतो, तेव्हा यांना झोमतं आणि तीन दिवसात माझ्यावर गुन्हा दाखल होतो. इतक्या महिन्यांपासून माझ्यावर गुन्हा दाखल का झाला नाही? तीनच दिवसात गुन्हा कसा दाखल झाला?” असे उन्मेष पाटील यांचे सवाल आहेत.








