जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२४ । भारतात एक देश एक निवडणूक विधेयकाला आणण्यासाठी भाजपा गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे. भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात यासंदर्भात आश्वासन दिले होते. आता याबाबत मोठी अपडेट समोर आलीय. आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘एक देश एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी दिली.
आता पुढे काय?
मोदी मंत्रिमंडळाने ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी दिल्यामुळे यासंदर्भातील विधेयक लवकरच संसदेत मांडण्यात येण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक येण्याची शक्यता आहे. आता यासंदर्भात सर्वात आधी संसदीय समितीची (जेसीपी) स्थापना करण्यात येईल. त्या समितीसमोर सर्व पक्ष आपली भूमिका मांडतील. त्यानंतर संसदेत हे विधेयक समंत केले जाईल. लोकसभा आणि राज्यसभेत एनडीएचे बहुमत आहे. त्यामुळे एनडीएमधील सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्यास हे विधेयक समंत होणार आहे. त्यानंतर राष्ट्रपती त्यांच्यावर सही करतील. त्याचे कायद्यात रुपांतर होईल. ‘एक देश, एक निवडणूक’साठी निवडणूक खर्चाचा युक्तिवादही केला जात आहे.
देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी निवडणुका होत असतात. तसेच सतत निवडणूक प्रक्रिया सुरु असते. त्यामुळे विकास कामांना खिळ बसतो. परंतु ‘एक देश, एक निवडणूक’’मुळे खर्च वाचेल आणि विकास कामेही गतिमान होतील, असा दावा भाजपकडून केला जात आहे.