जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । बोदवड शहरातील गोरक्षनाथ नगरात राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. विवाहितेला मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून छळ केल्याने विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. भावना नीलेश महाजन असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती, चुलत सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
बोदवडच्या गोरक्षनाथनगरमध्ये राहणाऱ्या भावना महाजन व निलेश सुभाष महाजन यांच्या लग्नाला सहा ते सात वर्षे झाली होती. परंतु त्यांना मूलबाळ होत नसल्याने पती व चुलत सासरे व सासू विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करीत तिला क्रूर वागणूक दिली होती. जाचाला कंटाळून भावना महाजन यांनी सोमवारी सकाळी ६.३० च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
मूलबाळ होत नसल्याने जाच करीत सासरच्या मंडळींनी आत्महत्येला प्रवृत्त केले म्हणून भूषण अशोक माळी (रा.असोदा) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून नीलेश सुभाष महाजन, चुलत सासरे प्रकाश दौलत महाजन व चुलत सासू मंगला प्रकाश महाजन (सर्व रा.गोरक्षनाथनगर, बोदवड) यांच्याविरुद्ध बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोदवड येथे शवविच्छेदनासाठी महिला डॉक्टर नसल्याने मृत विवाहितेवर जळगावी शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह असोदा येथील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पती नीलेश महाजन व चुलत सासरे प्रकाश महाजन यांना अटक करण्यात आली असून चुलत सासू मंगला महाजन यांना मंगळवारी अटक करण्यात येणार आहे. पोलिस उपनिरीक्षक शरद माळी तपास करीत आहेत.