जळगाव जिल्ह्यात अपघाताचे सत्र थांबेना! अज्ञात वाहनाच्या धडकेत काका पुतण्याचा मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२५ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नसून याच दरम्यान पाचोरा शहरातील निर्मल सीडस् समोर अपघात झाला. ज्यात काका पुतण्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर मंगतू राठोड (वय ३६) आणि संकेत भरत राठोड (वय १८ दोन्ही राहणार चंडिकावाडी ता.चाळीसगाव) अपघातातील मयत काका पुतण्याचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेनेबाबत असे की, ज्ञानेश्वर राठोड हे आपल्या पुतण्या संकेत भरत राठोड याच्या सोबत जळगावहून चाळीसगाव येथे जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. पाचोरा शहरातील निर्मल सीडस् कंपनीच्या समोरील रस्त्यावरून जात असतांना भडगावकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघात ज्ञानेश्वर राठोड आणि पुतण्या संकेत राठोड हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना घडल्यानंतर पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केल्याचे दिसून आले. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे हे करीत आहे.