जळगाव लाईव्ह न्यूज । नशिराबाद रस्त्यावरील चिरमाडे पेट्रोल पंपासमोर भरधाव कारने मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन फेकली गेली. याच वेळी एअर बॅग उघडल्याने चालक व त्याच्या बाजूला बसलेला प्रवासी थोडक्यात बचावला. या अपघातात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जीएमसीत दाखल करण्यात आले आहे.तर मालवाहू वाहन रस्त्यावरील दुभाजकावर चढले.

या घटनेबाबत असे की, भुसावळकडून जळगावकडे मारुती बलेनो चारचाकी (क्रमांक एमएच-१९, सीव्ही ६३८७) येत होती. तर महेंद्र पिकअप मालवाहू वाहन जळगावकडून अमरावतीकडे खजूर घेऊन जात होते. चिरमाडे पेट्रोल पंपासमोर भरधाव कारने मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. यात कार तीन पलट्या घेऊन खड्ड्यात फेकली गेली. याच वेळी एअर बॅग उघडल्याने चालक व सोबतचा प्रवासी सुदैवाने बचावले; पण ते गाडीत मागे फेकले गेल्याने जखमी झाले.

तर महेंद्र पिकअप मालवाहू वाहन दुभाजकावर चढले. अपघातामुळे काही वेळ जळगाव-नशिराबाद मार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांची मोठी रांग लागली होती. नागरिकांनी जखमींना गाडीतून काढून जीएमसीत दाखल केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नशिराबाद पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, तरसोद बायपासकडील सर्व्हिस रोडचे काम सुरू असल्याने डाव्या बाजूचा सर्व्हिस रोड बंद होता. त्यामुळे एक बाजूने वाहतूक सुरू असल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.






