Chopda : गावठी पिस्तूल अन् ५ जिवंत काडतुसांसह दोघे पोलिसांच्या जाळ्यात

एप्रिल 20, 2026 6:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२६ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीवर अंकुश मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने चोपडा तालुक्यात मोठी कारवाई करत, गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोटारसायकल आणि मोबाईलसह ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

cp

राहुल कुवरसिंग पावरा (वय २२, रा. उमर्टी, ता. चोपडा, जि. जळगाव) आणि गणपत प्रभाकर किर्तने (वय २८, रा. असोला जवळ बाजार, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून दोघांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे घटना?

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की, उमर्टी गावाकडून कृष्णपूर ते मामलदे मार्गे चोपडा दिशेने दोन तरुण एका मोटारसायकलवरून विनापरवाना शस्त्र घेऊन येत आहेत. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी मामलदे मार्गावर सापळा रचला.

काही वेळातच उमर्टीकडून येणारी हिरो होंडा मोटारसायकल (क्र. MH-१९-S-१४५०) पोलिसांना दिसली. पोलिसांनी शिताफीने ही मोटारसायकल अडवून त्यावरील दोन संशयितांना ताब्यात घेतले. अटकेनंतर झडती घेतली असता त्यांच्याकडून १ गावठी पिस्तुल, ५ जिवंत काडतुसे, १ मोटारसायकल व २ मोबाईल फोन असा एकूण ६९,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांवर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई?

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वळते, पोलीस हवालदार विष्णू बिनहाडे, दीपक माळी, रवींद्र पाटील, विलेश सोनवणे आणि पोलीस अंमलदार रावसाहेब पाटील यांच्या पथकाने पार पाडली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now