जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात सध्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात हे प्रकरण चांगलंच चर्चेत असून त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला जातोय. खरातसोबतचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकरांवर टीकेची झोड उठत आहे. यानंतर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून त्यानंतर आता या पदावर कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा रंगली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी पक्षातील दोन महिला नेत्याच्या नावाची चर्चा होऊ लागलीय. वैशाली नागवडे, आणि प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा होत आहे. या दोघांपैकी एका नेत्याकडे महिला आयोगाचं अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार आहे.

प्रतिभा शिंदे या जळगावमधील राष्ट्रवादीच्या सक्रिय नेत्या असून अलीकडेच त्यांनी काँग्रेसमधून अजित पवार गटात प्रवेश केला होता. दुसरीकडे वैशाली नागवडे या पक्षातील अनुभवी नेत्या असून विविध पदांवर त्यांनी काम केले आहे आणि संघटनात्मक पातळीवर त्यांचा मोठा प्रभाव मानला जातो.
नागवडे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नेत्या आहेत. पवार कुटुंबीयांतील प्रत्येक नेत्यांशी त्यांचे घनिष्ट संबंध आहेत. त्यांनी पंचायत समितीचे सदस्य, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद, महानंदाचे अध्यक्षपद, पंचायतराज कमिटीचे अध्यक्षपद, प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. राष्ट्रवादीतील सर्वाधिक मदत करणाऱ्या पदाधिकारी म्हणून त्यांचे नाव चर्चेत राहिले आहे. महिला बचत गट, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
दरम्यान, आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. लवकरच याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






