⁠ 
शनिवार, जून 15, 2024

दुर्दैवी : जळगाव जिल्ह्यात चोवीस तासांत दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२३ । शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीय. अशातच कर्जाला कंटाळून जळगाव जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

चोरवड येथील हेमराज शेखर पाटील (वय २७) या तरुण शेतकऱ्याने बुधवारी (ता. १३) विषप्राशन करून तर कुऱ्हा-हरदो येथे शंकर कृष्णा माळी (वय ४२) या शेतकऱ्याने कर्ज व दुबार पेरणीला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. या दोन्ही घटना गेल्या चोवीस तासांत घडल्या असून, समाजमन सुन्न झाले आहे.

पारोळा तालुक्यातील चोरवड येथील हेमराज शेखर पाटील यांच्याकडे सुमारे पाच बिघे शेती आहे. यंदा शेतीत कापसाची लागवड केली होती. कापसाच्या पिकासाठी त्यांनी पीककर्जही घेतले होते. परंतु या वर्षी तालुक्यात कधी जास्त, तर कधी कमी व दीर्घकाळ खंड पडलेल्या पावसामुळे शेतात नापिकीसारखी परिस्थिती उद्‍भवली.त्यामुळे पीककर्ज कसे फेडायचे, घरसंसार कसा चालवायचा, या नैराश्यातून त्यांनी मध्यरात्री एकच्या सुमारास आपल्या शेतात काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.याबाबत त्यांनी आपले चुलत भाऊ यांना ही घटना फोनवरून सांगितली. या वेळी तत्काळ नातेवाइकांनी धाव घेत त्यांना पारोळा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दुसरी घटना तालुक्यातील कुऱ्हा-हरोदो येथील शेतकरी शंकर कृष्णा माळी यांनी कर्जाला कंटाळून आपल्या घरातील छताच्या लाकडी सरईला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतकरी शंकर माळी यांनी शेतामध्ये पेरणी केली होती. परंतु मागील काळात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने माळी यांच्या शेतातील माती वाहून गेली. शंकर माळी यांनी पेरणीसाठी विविध कार्यकारी सोसायटीकडून एक लाख कर्ज आणि काही खासगी बचत गटाच्या कर्ज काढले होते. त्याचा बोजा डोक्यावर होता. शेतकरी माळी हे मंगळवारी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले आणि दुपारी तीनपर्यंत घरी आले आणि लागलीच साडेचारला छताच्या लाकडी सरईला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.