जळगाव लाईव्ह न्यूज । बोगस अपंग प्रमाणपत्र सादर करून नोकरी लाटल्याप्रकरणी राज्यभरात कारवाईचा सपाटा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली आणि नंतर पदोन्नतीही घेतल्याचा दोघा कर्मचाऱ्यांचा प्रताप समोर आला आहे. याप्रकरणी दोघा कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून याबाबतचे आदेश जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी काढले. या कारवाईने संबंधीत प्रमाणपत्र धारकांच्या गोटात खळबळ माजली आहे.

पाचोरा पंचायत समितीत कार्यरत असलेले वरिष्ठ लेखा सहायक विक्रम सुरेश पाटील आणि धरणगाव पंचायत समितीत कार्यरत असलेले कनिष्ठ लेखा सहायक संतोष लक्ष्मण पाटील अशी निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

या दोघांनीही दिव्यांग प्रवर्गातून सरळ सेवेद्वारे नोकरी मिळवली होती. मात्र, त्यांच्या दिव्यांगत्वाबाबत संशय निर्माण झाल्याने त्यांची जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामार्फत पुनर्तपासणी करण्यात आली. या तपासणीत तफावत आढळून आली. संतोष पाटील यांनी ४० टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांचे दिव्यांगत्व शून्य टक्के आढळले आहे. तर विक्रम पाटील यांनी ७० टक्के दिव्यांगत्वाचा दावा केला होता.

परंतु त्यांचे दिव्यांगत्व केवळ १० टक्के असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानूसार जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत. दरम्यान, इतर दिव्यांग असलेल्या कर्मचाऱ्यांचीही दिव्यांगत्वाची पुन्हा तपासणी सुरु झाल्याने बोगस प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांची संख्या आणखी वाढू शकते.



