जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२१ । अवैध वाळू वाहतुकदारांना अडवण्यास गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या अंगावर तिघांनी ट्रॅक्टर चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना २२ रोजी मध्यरात्री अमळनेर तालुक्यातील गंगापुरी येथे तापी नदी पात्रात घडली. याप्रकरणी तीन ट्रॅक्टर जमा करण्यात आले असून तीन ट्रॅक्टर चालक पळून जाण्यात यशस्वी झाले.
याबाबत असे की, तालुक्यात गेल्या काही दिवसात अवैध वाळू वाहतूकीचे प्रमाण वाढले आहे. यात पोलिसांनी दोनवेळा अवैध वाळू वाहतुकीची मोठी कारवाई केल्यानन्तर प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी तहसीलदार मिलिंद वाघ, तलाठी गणेश महाजन, पुरुषोत्तम पाटील, हर्षवर्धन मोरे, तिलेश पवार, संदीप शिंदे, सतीश शिंदे, सचिन बमनाथ, बळीराम काळे, जितेंद्र जोगी, स्वप्नील कुलकर्णी यांच्या पथकाला घेऊन गंगापुरी येथे गेले तीन पथकात विभागणी करून एक नदी पात्रात तर दोन जळोद पुलाच्या दोन्ही बाजूस लपून बसले.
तापी नदीत ६ ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्यावर तलाठी गणेश महाजन, तिलेश पवार, सतीश शिंदे यांनी तेथील ट्रॅक्टर (एमएच १९/सीजे१५३३)वरील चालकाला थांबवून त्याचे व मालकाचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव जगन पावरा (बुधगाव, ता. चोपडा) व मालकाचे नाव महेश ज्ञानेश्वर पवार, अतुल ज्ञानेश्वर पवार (अनवर्दे, ता. चोपडा) असे सांगितले व इतर दोन ट्रॅक्टर चालकांनी त्यांचे नाव न सांगता दोन्हीचे मालक धीरज प्रभाकर धनगर (बुधगाव, ता. चोपडा) असे सांगितले.
त्यांनतर तिन्ही ट्रॅक्टर तहसिल कार्यालयात नेण्यासाठी सांगत असताना तिन्ही मालक महेश पवार, अतुल पवार आणि धीरज धनगर त्याठिकाणी येऊन दमबाजी करू लागले आणि तलाठी गणेश महाजन याना ट्रॅक्टरवरून खाली ओढण्याचा प्रयत्न केला आणि ट्रॅक्टर चालकास अंगावर ट्रॅक्टर चालवण्यास सांगितल्याने चालकानेदेखील दोनवेळा ट्राॅली मागे पुढे करून चाकाखाली दाबण्याचा प्रयत्न केला.
लगेच मारहाण करून ट्रॅक्टरसह पळून गेले. युवराज पाटील (बुधगाव) यांचा ट्रॅक्टर (एमएच१९एएन४६५५), महेश ज्ञानेश्वर पवार (अनवर्डे), अनिल पाटील यांचे ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहेत तर गणेश महाजन यांच्या फिर्यादीवरून जगन पावरा, महेश पवार, अतुल पवार, धीरज धनगर यांच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.